इथेनॉल उत्पादन क्षेत्रात नायरा 600 कोटींची गुंतवणूक करणार
मुंबई: रशियन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज रोझनेफ्टचे पाठबळ लाभलेल्या नायरा एनर्जीने भारतातील इथेनॉल उत्पादन क्षेत्रात उडी घेण्याची घोषणा केली आहे.
₹600 कोटींची गुंतवणूक करून, प्रारंभी दोन प्रकल्प उभारण्यात येतील. भविष्यात प्रकल्प संख्या पाचवर नेण्याची योजना आहे, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रत्येक प्लांटची दररोज 200 किलो लिटर इथेनॉलची उत्पादन क्षमता असेल. हे आंध्र प्रदेशातील नायडुपेटा आणि मध्य प्रदेशातील बालाघाट येथे उभारले जातील आणि 2026 पर्यंत ते सुरू होणार आहेत. खराब तांदूळ आणि मक्याचा फीडस्टॉक म्हणून वापर केला जाईल.
“आमच्याकडे इथेनॉलच्या आघाडीवर मोठ्या योजना आहेत. 2025 पर्यंत, आम्हाला 20% इथेनॉलचे मिश्रण करायचे आहे, त्यामुळे आमच्याकडे 100% सोर्सिंगचे ध्येय आहे. दीर्घकाळात किमान पाच इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे; त्याची सुरुवात या दोन प्रकल्पांद्वारे करत आहोत,” असे नायरा एनर्जीचे कार्यकारी अध्यक्ष प्रसाद पणीकर म्हणाले.
गुजरातमधील वाडीनार येथे 20-दशलक्ष-मेट्रिक-टन क्षमतेचा क्रूड तेल शुद्धीकरण प्रकल्प चालवणारी नायरा एनर्जी त्याच सुविधेत पॉलीप्रॉपिलीन युनिटही सुरू करणार आहे. कंपनी वार्षिक 450,000 टन क्षमतेचे पेट्रोकेमिकल युनिट स्थापन करण्यासाठी ₹6,000 कोटींची गुंतवणूक करत आहे. रिफायनरीचे आयुर्मान आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी ते आधुनिकीकरणासाठी ₹4,000 कोटींची गुंतवणूक करत आहे. ही गुंतवणूक 2026 पर्यंत केली जाईल.
नायरा एनर्जीचा भारताच्या क्रूड तेल शुद्धीकरणातील आणि देशांतर्गत इंधन किरकोळ बाजारातील वाटा ८ टक्के आहे. तसेच पेट्रोकेमिकल्समध्ये 7% वाटा आहे.
“गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये, कठीण अशी रिफायनरी चालवतानाही आम्ही रिटेल व्यवसायात चांगली वाढ साधली आहे,” असे पणीकर म्हणाले. कंपनीने त्यात लक्षणीय वाढ करण्याची योजना आखली आहे. तीन ते चार वर्षांत इंधनाच्या किरकोळ विक्रीची आउटलेट 6,600 वरून 10,000 पर्यंत पोहोचतील, असेही त्यांनी सांगितले.
पणीकर म्हणाले की, नायरा एनर्जीची दृष्टी त्याच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे आणि उच्च वाढीच्या पेट्रोकेमिकल उद्योगात आघाडीवर राहणे आणि देशांतर्गत ऊर्जेच्या गरजा देखील पूर्ण करणे आहे.
“आम्ही भारताच्या इंधन बाजाराबाबत खूप आश्वासक आहोत. भारताला तेलाची गरज आहे, मग ते ऑटो इंधन असो किंवा जेट इंधन किंवा यापैकी इतर पेट्रोकेमिकल्स असो,” असे ते म्हणाले.
स्वच्छ इंधनाच्या प्रयत्नात, कंपनी शाश्वत विमान इंधन व्यवसायात प्रवेश करण्याच्या संभाव्यतेचा अभ्यास करत आहे.
शाश्वत विमान इंधन (SAF) हे आणखी एक ऊर्जा क्षेत्र आहे, ज्याबद्दल कंपनी सकारात्मक आहे. “SAF आर्थिकदृष्ट्या आकर्षक आहे. फीडस्टॉक उपलब्ध असेल, तर आम्हाला या क्षेत्रातही उतरायचे आहे. रिफायनरीसोबत SAF युनिट उभारले तर परवडू शकते, अन्यथा ते स्वतंत्रपणे उभे करणे खूप महाग आहे, असेही ते म्हणाले.