महावितरणचा निष्काळजीपणा; तब्बल १४ एकर ऊस जळाला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पूर्णा : ऊस तोडणीचा हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असतानाच पूर्णा तालुक्यातील कळगाव शिवारातील उभ्या असलेल्या सहा शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत तब्बल १४ एकरांवर ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास दरम्यान घडली. यामध्ये सहा शेतकऱ्यांचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच ही घडल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

रविवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा अचानक सुरळीत झाल्यावर विद्यूत तारेत शॉर्टसर्किट झाले व त्यातून पडलेल्या ठिणग्या वाऱ्याच्या झोताने उसाच्या शेतात पसरून आग झपाट्याने वाढत गेली. आसपासच्या शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीने इतके रौद्ररूप धारण केले की ती आटोक्यात आणणे अशक्य झाले. या आगीत सुभाष निवृत्ती सूर्यवंशी, संकेत सुरेश सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी, शिवराज सूर्यवंशी, विद्या सुभाष सूर्यवंशी, शितल सुरेश सूर्यवंशी या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित १४ एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली होती.

दरम्यान, या पीडित शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत करून अशा घटनांवर कायमचा बंदोबस्त करावा, तसेच दरवर्षी शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असतानाही महावितरणकडून कोणतीही योग्य कारवाई अथवा प्रतिबंधक उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »