इतर धान्यांपासून इथेनॉलसाठी नवी योजना : डीईपी
नवी दिल्ली : मक्यासारख्या धान्यापासून इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी (OMC) नवी योजना जाहीर केली आहे. ती केवळ आठ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे, त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. या योजनेद्वारे या राज्यांमधील आगामी प्लांट्समधून दरवर्षी 300 कोटी लिटरपेक्षा अधिक इथेनॉल खरेदी केला जाईल. त्यासाठी या कंपन्यांनी प्रस्ताव मागवले आहेत.
उसासारख्या फीडस्टॉकचाही समावेश या योजनेत आहे, मात्र प्राधान्यक्रमात त्याला तिसरे स्थान आहे.
‘डीईपी’ म्हणजे ‘डेडिकेटेड इथेनॉल प्लांट’ (DEP) असे या योजनेचे नाव आहे. त्यासाठी संबंधित राज्यातील इच्छुकांना (प्रस्ताव सादर करणारे) इरादा पत्र (LoI) दिले जाईल आणि नंतर त्याने हे पत्र जारी केल्याच्या तारखेपासून 2 वर्षांच्या आत योजना कार्यान्वित करू, असे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
सरकारी तेल विपणन कंपन्या (OMCs) आठ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील जैवइंधनाच्या आगामी उत्पादन सुविधांमधून 300 कोटी लिटरहून अधिक इथेनॉल खरेदी करतील. तामिळनाडू, केरळ, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगण, राजस्थान, गोवा, ओडिशा आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर आणि लडाख यांचा या योजनेत समावेश आहे.
OMCs म्हणजे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल अशा कंपन्या, दरवर्षी सर्वाधिक 97 कोटी लिटर तामिळनाडूमधून खरेदी करतील, त्यानंतर केरळ (55 कोटी लिटर), राजस्थान (44 कोटी लिटर), गुजरात (33 कोटी लिटर) आणि आंध्र प्रदेश (30 कोटी लिटर) असा कोटा ठरवण्यात आला आहे.
OMCs चा इथेनॉल खरेदी गटाने (OEPG) प्रस्ताव मागवले असून, त्यातून निवडण्यात आलेल्या प्रस्तावदारांसोबत त्रिपक्षीय करार करण्यात येतील. तसेच त्यांच्याकडून त्यांचा प्रकल्प सुरू करून दोन वर्षांच्या आत इथेनॉल पुरवठा सुरू करू, असे प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत दीर्घ मुदतीचे करार केले जातील. ज्यांनी प्रकल्प उभे केले आहेत, मात्र इथेनॉल उत्पादन सुरू केले नाही, अशांनाही या योजनेसाठी पात्र समजले जाणार आहे.
मक्याला प्राधान्य
OMCs ने एक चिन्हांकन प्रणाली सुरू केली आहे ज्यामध्ये मक्याला प्राधान्य दिले गेले आहे. उदाहरणार्थ, कॉर्न/मका किंवा टॅपिओका (खराब कॉर्न/मका/टॅपिओकासह) सारख्या फीडस्टॉकच्या वापराला सर्वाधिक 20 गुण आहेत. त्याचप्रमाणे, तांदूळ आणि कॉर्न/मका, तसेच खराब झालेले तांदूळ आणि कॉर्न/मका यांच्या मिश्रणाचा वापर झाल्यास त्याला 15 गुण आहेत. टॅपिओका म्हणजे साबुदाणा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मुळे.
उसावर आधारित फीडस्टॉक किंवा उसावर आधारित फीडस्टॉकसह संयुक्तपणे कॉर्न/मका/टॅपिओका/तांदूळ (खराब झालेले कॉर्न/मका/टॅपिओका/तांदूळ यासह) 10 गुण आहेत.
महाराष्ट्रामध्ये सध्या ‘स्टँड अलोन’ (एकल) डिस्टिलरींची संख्या खूप आहे, तसेच ऊस रस, शुगर ज्यूस, बी हेवी, सी हेवी मोलॅसेसपासून विपुल प्रमाणात पुरवठा होतो. सध्याच्या राष्ट्रीय इथेनॉल उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा निम्म्यापेक्षा अधिक आहे.