प्रादेशिक साखर कार्यालयांना नव्या कोऱ्या गाड्या

पुणे : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सोमवारी पहिल्या टप्प्यात सहा प्रादेशिक कार्यालयांना न्यू बोलेरो एसयूव्ही गाड्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे हेदखील आवर्जून उपस्थित होते.. साखरेची प्रादेशिक कार्यालय सक्षम होण्याच्या दृष्टीने साखर आयुक्तांनी या बाबीचा जोरदार पाठपुरावा केला आणि शासन मान्यतेने सर्व प्रादेशिक कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये गाड्या देण्याचं नियोजन करण्यात आलं.
याशिवाय आठ प्रादेशिक कार्यालयांना शासनाकडून प्राप्त 18 लॅपटॉपचे वाटपही यावेळी आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले . केवळ प्रादेशिक सहसंचालक साखर यांनाच नव्हे तर त्यांच्या आधीन असलेले उपसंचालक आणि विशेष लेखा परीक्षक यांना सुद्धा लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.
साखर प्रादेशिक कार्यालय सक्षम होण्याच्या दृष्टीने डॉ. खेमनार यांनी या बाबींचा खूप पाठपुरावा केला आणि बरेच वर्ष प्रलंबित असलेली मागणी प्रत्यक्षात आली. याबद्दल डॉ. खेमनार यांना सर्वांनी मनापासून धन्यवाद दिले.
सुरवसे यांना भावपूर्ण निरोप आणि डॉ. केदारी यांचे स्वागत

प्रादेशिक कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये साखर आयुक्त कार्यालयातून पदोन्नत झालेले राजेश सुरवसे (अप्पर निबंधक प्रशासन) यांचा भावपूर्ण निरोप आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम साखर आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच नवनियुक्त पदोन्नत साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव यांचे स्वागत कार्यालयामध्ये करण्यात आले. त्यांची पुढील संपूर्ण कारकीर्द साखर आयुक्तालयातच जावी; तसेच त्यांच्याकडून नवनवीन उपक्रम साखर आयुक्तालयाच्या हिताच्या दृष्टीने पुढील अनेक वर्षांमध्ये राबविण्यात यावेत. त्यांच्या कारकीर्दीचा अमिट ठसा साखर आयुक्तालयावर उमटावा, अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या. नव्याने नियुक्त झालेले साखर संचालक (विकास) महेश झेंडे यांचेही स्वागत यावेळी करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा सर्वांकडून देण्यात आल्या.
दिमतीला नवी वाहने मिळाल्याने प्रादेशिक साखर कार्यालयांची कार्यक्षमता दुपटीने वाढेल, अशी अपेक्षा ‘शुगरटुडे’कडून व्यक्त करण्यात येत आहे.