पुढील हंगामात ऊस क्षेत्र ३० टक्क्यांनी घटणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर उद्योगासाठी चिंतेची बातमी

पुणे : यंदाचा ऊस गळीत हंगाम अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पडण्याची खात्री एव्हाना पटल्याने, साखर उद्योग क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात असतानाच, चिंतेचे मळभ निर्माण करणारी बातमी आली आहे. पुढील म्हणजे २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये ऊस क्षेत्र ३० ते ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..

साखर संकुलातील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला. भारतासाठी आगामी गाळप हंगाम कसा राहील, याची माहिती केंद्र सरकारकडून गोळा केली जात आहे. उसाचे सर्वात मोठे क्षेत्रे असलेले उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये आहेत.

महाराष्ट्रामध्ये यंदाच्या तुलनेत पुढील हंगामात एकूण ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि हे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांवर जाऊ शकते, त्यामुळे पुढील हंगामामध्ये साखर कारखान्यांसमोर ऊस टंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याचा धोका आहे, असा अहवाल महाराष्ट्राच्या साखर आयुक्तालयाने केंद्र सरकारला पाठवला असल्याची माहिती मिळाली.

यंदा साखर उत्पादन खूपच कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण ते अंदाजापेक्षा खूप चांगले होणार आहे. पण त्याचवेळी पुढील हंगामाबाबत चिंता लागून राहिली आहे.

‘यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले. त्यामुळे नव्याने ऊस लागवड होणारच नाही. शिवाय पाण्याअभावी सध्याचे ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटणार आहे’, अशी शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे. दऱम्यान, पुढील हंगामात उत्तर प्रदेशातही ऊस क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.

याबाबत ‘शुगरटुडे’शी बोलताना नामवंत ऊसतज्ज्ञ डॉ. सुरेशराव पवार म्हणाले, ‘आम्हाला पूर्वीपासून या हंगामापेक्षा पुढच्या हंगामाचीच भीती सतावत आहे आणि या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. परंतु या संभाव्य संकटातून मार्ग काढता येऊ शकतो. त्यावर उपाय आहे – खोडवा, निडवा जतन करणे आणि त्यांचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार संगोपन करणे. खोडवा – निडवा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यास पुढील गळीत हंगाम तेवढा जड जाणार नाही, जेवढा आपण अंदाज बांधत आहोत.’

माझे सर्व साखर कारखाने, राज्याचा शेती विभाग आणि शेतकऱ्यांना आवाहन आहे की यावेळी खोडवा, निडवा ठेवा. ऊस पीक उखडून काढून टाकू नका. हाच उपाय साखर उद्योग तारून नेऊ शकतो, म्हणजेच शेतकरी वर्गही तारून नेऊ शकतो, यंदाच्या पावसाळ्यात पाऊस मुबलक झाला तरी त्याचा आगामी गळीत हंगामाला फायदा होणार नाही, तो त्यापुढच्या हंगामासाठी होईल, अशी कळकळीची सूचना डॉ. पवार यांनी केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »