जतन करा खोडवे, सुटेल संकटाचे कोडे!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ही दोन वर्षे साखर उद्योगासाठी काळजीची! संकटावर मात करण्यासाठी असे करा नियोजन

  • डॉ. सुरेशराव पवार,
  • डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन(DSTA) शिवाजीनगर पुणे
Dr. Suresh Pawar, sugarcane scientist
sureshrao pawar

महाराष्ट्रामध्ये यावर्षी (२०२३-२४) हवामान बदलामुळे सुमारे १५ ते २० टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेषतः साखर पट्ट्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतेक सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे यावर्षी उसाची वाढ कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादकता १५ ते २० टक्के कमी येण्याचे संकेत दिसत आहेत. त्यातच साखर कारखान्याची वाढलेली संख्या आणि वाढलेली गाळप क्षमता यामुळे यावर्षी साखर कारखान्यांना उसाची कमतरता भासणार आहे.

उसाच्या कमतरतेमुळे साखर उद्योग सन २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये अडचणीत येणार: उपाय आणि नियोजन महत्त्वाचे आहे.

यावर्षी साखर कारखाने जेमतेम ९० ते १०० दिवसांपर्यंत गाळप करतील असा अंदाज आहे. तसेच यावर्षी खरीप हंगामामध्ये कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे आडसाली आणि पूर्वहंगामी उसाची लागवडही २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. शिवाय परतीच्या पावसाचे प्रमाणही फारच कमी आहे. राहिलेल्या काळातही पाऊस होण्याची शक्यता नसल्यामुळे सुरू उसाची लागवड अत्यंत कमी होण्याचे संकेत दिसत आहेत.


या सर्व अवर्षण परिस्थितीमुळे या वर्षाप्रमाणेच पुढील वर्षीही उसाची प्रचंड कमतरता भासणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन (DSTA) यांच्या तांत्रिक बाबींच्या विचार मंथनामधून साखर उद्योग वाचविण्यासाठी जास्तीत जास्त ऊस लागवड आणि तुटलेल्या उसाचे जास्तीत जास्त खोडवे ठेवून त्याचे संगोपन कसे करता येईल हे या लेखात नमूद केले आहे.
यावर्षी एक नोव्हेंबर पासून साखर कारखाने चालू झाले आहेत आणि ते जानेवारी ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत गळीत करतील असा अंदाज आहे. या सर्व कालावधीत तुटलेल्या उसाचे जास्तीत जास्त खोडवे ठेवल्यास पुढील हंगामात ऊस उपलब्ध होऊन शकेल. म्हणून तुटलेल्या उसाचे खोडवे ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे आणि त्यासाठीचे सुधारित तंत्रज्ञान साखर कारखान्यांनी सर्व शेतकऱ्यापर्यंत पोचविणे महत्त्वाचे आहे.
दुष्काळी परिस्थितीमध्ये कमीत कमी पाण्यामध्ये आणि पाण्याचा ताण सहन करणारे ऊस पीक म्हणजेच उसाचा खोडवा आणि त्याचे जतन करणे साखर कारखान्यांच्या दृष्टीने पुढील दोन वर्षासाठी महत्त्वाचे आहे. म्हणून खोडवा ऊस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि अवर्षण काळात या पिकाची देखभाल करण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या सर्वच उसाचा खोडवा आणि निडवा ठेवावा. त्याचप्रमाणे तुटलेल्या उसातील पाचटाचे आच्छादन, वेळेवर बुडखे छाटणे, नांग्या भरणे, उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन, खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, जैविक खतांचा वापर ,पीक संरक्षण इत्यादी बाबी वेळेवर करणे महत्त्वाचे आहे.

खोडवा घेतानाची दक्षता
• लागवडीच्या तुटलेल्या उसामध्ये शक्यतो खोडकीड आणि तणांचा प्रादुर्भाव नसावा किंवा कमीत कमी असावा.
• तुटलेल्या उसाचे उत्पादन एकरी ४० ते ५० टनापर्यंत आणि तुटाळ संख्या कमी असलेल्या उसाचाच शक्यतो खोडवा/ निडवा ठेवावा.
• पाचट जाळू नये त्याचा अच्छादनसाठी वापर करावा
• उसाची तोडणी झाल्यावर शेतामध्ये पाचट शिल्लक राहते. या पाचटाचे आच्छादन व सेंद्रिय खत म्हणून चांगला उपयोग होतो. म्हणून ऊस तोडणी नंतर राहिलेले पाचट न जाळता ते खोडव्यात अच्छादनासाठी वापरावे.
• सध्या रुंद सरी लागवड केली जाते त्यामुळे पट्ट्यात सर्व पाचट समप्रमाणात पसरावे. पाचटाचे ढिग कोठे असतील तर तेही सर्व दूर सारखे पसरावे. एक एकर क्षेत्रातून ४ ते ५ टन पाचट मिळते.
• शेतात पाचट कुजविल्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, जिवाणूंची संख्या वाढते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होते, तण येत नाही, मुळांची वाढ होते, ऊस जोमात वाढतो; तसेच जमिनीचे तापमान योग्य प्रमाणात राखले जाते. म्हणून पाचट अच्छादन या अवर्षण काळात फार महत्त्वाचे आहे.
• सुरुवातीला पाचट सरीत बसत नसल्यास पाचट शेताबाहेर काढू नये. सर्व पाचट समप्रमाणात सारखे पसरून पाणी द्यावे. छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने दाबून घ्यावे.
• पाचटाची कुट्टी करून पाचट शेतातच सारखे राहील असे नियोजन करावे.
• संरक्षणाच्या दृष्टीने शेताच्या चोहोबाजूने २ ते ३ मीटर अंतर सोडून पाचट पसरविण्याची काळजी घ्यावी. त्यामुळे काही कारणाने पाचट पेटल्यास नुकसान होणार नाही.
• एक टन पाचटापासून ४५० किलो सेंद्रिय कर्ब, ५ किलो नत्र, 2 किलो स्फुरद 3 ते च 4 किलो पालास मिळतो. म्हणून पाचट न जाळता कुजविणे शेतकऱ्याच्या हिताचे आहे, शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.

पाचट कुजविण्यासाठी एकरी 40 किलो युरिया व 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर टाकावे. तसेच द्रवरूप पाचट कुजविणारे जिवाणू अधिक 100 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून 100 लिटर पाण्यात स्लरी करून पाचटावर सम प्रमाणात टाकावी. पाचट हळूहळू कुजविण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालास कुजविणाऱ्या जिवाणू खतांची गरज असते. यानंतर ऊसाला पाणी द्यावे.

पाणी सर्वत्र पोहोचेल याची काळजी घ्यावी. पाचटाचा मातीशी संबंध येण्यासाठी पाचट दाबून घ्यावे. तुटलेल्या उसात ट्रॅक्टरच्या सहाय्याने कुट्टी केल्यासही पाचटावर वरील प्रमाणे प्रक्रिया करावी. त्यामुळे पाचट कुजण्यास मदत होते. या अवर्षण काळात पाचटाचा उपयोग अच्छादन म्हणून प्रामुख्याने करावा. त्यामुळे जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग मंदावतो, जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो, त्यामुळे पाण्यात बचत होऊन कमी पाण्यात खोडवा घेणे शक्य होते, शेत तण विरहित राहते, त्यामुळे खुरपणी खर्चातही बचत होते.

जमिनीतील तापमान कमी राहिल्यामुळे मुळांची वाढ चांगली होते. तसेच उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे जमिनीतील नत्र स्थिरीकरण, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांचे उपलब्धता प्रमाणदेखील वाढते. त्यामुळे जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता सुधारून पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते. पाचट अच्छादनामुळे या अवर्षण काळात नोव्हेंबर नंतर ठेवलेल्या उसाचे 3 ते 4 पाण्यात तसेच उन्हाळ्यात एखादा पाऊस पडल्यास जून पर्यंत पिकाचे संगोपन करून खोडव्याचे शाश्वत उत्पादन मिळू शकेल. म्हणून यावर्षी खोडवा आणि निडवा ऊस ठेवणे ऊस उपलब्धतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

पाचटाचे अच्छादनाबरोबरच पाचट पसरविताना कुठल्याही परिस्थितीत बुडखे वर राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जमिनीवर राहिलेले बुडखे धारदार कोयत्याने जमिनीच्या पृष्ठभागाबरोबर छाटून घ्यावेत त्यामुळे जमिनीतून येणारे कोंब जोमदार येतात. बुडखे छाटल्यानंतर लगेचच 15 ग्रॅम 0.1 टक्के बाविस्टीन अधिक 40 मिली क्लोरोपायरीफॉस 15 लिटर पाण्यात मिसळून बुडख्यावर फवारणी करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा आणि किडींचा प्रतिबंध होतो.
खोडवा राखताना रोप तयार करून नांग्या तुटाळ भरणे गरजेचे आहे. नांग्या भरल्यावर जमिनीत वापसा पाहून पाणी द्यावे. ही सर्व कामे ऊस तुटल्यानंतर 15 दिवसाच्या आत वेळेवर होणे आवश्यक आहे.

अवर्षण परिस्थितीत खोडव्यासाठी आणखी काही महत्त्वाच्या टिप्स

• पाचटाचे अच्छादन करून बाष्पीभवन वेग कमी करून पाण्याची बचत करावी.

• पालाश खताची मात्रा शिफारशीत मात्रेच्या 25% जास्त खोडवा ठेवताना सुरुवातीसच द्यावी. त्यामुळे पानातून होणाऱ्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवून पीक पाण्याचा ताण सहन करण्यास सशक्त होते.

• खोडवा पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास मुरेट ऑफ पोटॅश 2 % अधिक युरिया २% या प्रमाणात संयुक्त द्रावण करून 21 दिवसाच्या अंतराने फेब्रुवारी ते मे महिन्यात 3-4 फवारण्या कराव्यात.

• पाण्याची कमतरता असल्यास ऊस पिकातील पक्व आणि वाळलेली पाने काढून अच्छादन म्हणून वापरावीत. पाने काढताना वरील सात ते आठ हिरवे पाने काढू नयेत.

• सेंद्रिय पदार्थाचा जास्तीत जास्त वापर करून ऊस पीक तणविरहित ठेवावे त्यामुळे ऊस पीक कमी पाण्यातही तग धरून राहते.

• पानांमधून होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन या बस्परोधकाची 8% (60 ते 80) ग्राम प्रति लिटर फवारणी 21 दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा उन्हाळ्यात करावी..

• श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना येथील शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रयोगातून असे दिसून आले आहे की अवर्षण काळात लागवडीच्या व खोडवा पिकामध्ये एकरी 5 किलो युपीएल (UPL) कंपनीचे झेबा नावाची पाणी धरून ठेवणारी पावडर खोडवा ठेवावयाच्या शेतात खता बरोबर सुरवातीला द्यावी. यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करते म्हणून खोडवा ठेवते वेळेस झेबा पावडरचा वापर करावा.

सध्याच्या अवर्षण परिस्थितीमध्ये साखर कारखान्यांना ऊस तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खोडवा ठेवायचा आहे; परंतु पाण्याची उपलब्धता मुळीच नाही, अशा ठिकाणी नोव्हेंबरनंतर ऊस तुटून गेल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खोडवा पीक नांगरू नये. पाचट न जाळता ते सर्व क्षेत्रावर सम प्रमाणात पसरावे.

पाण्याशिवाय सदर खोडव्याचा प्लॉट तसाच पडू द्यावा. उन्हाळ्यातील वळवाच्या मे जून मध्ये पाऊस झाल्यास खोडवा चांगला फुटू शकतो. भारी जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे खोडवा पीक तग धरू शकते.

जून -जुलै नंतर चांगला पाऊस झाल्यास खत आणि पाण्याचे नियोजन केल्यास पुढील हंगामात या ऊसा पासून गाळपास चांगले उत्पन्न आणि साखर उतारा मिळू शकतो. म्हणून सध्याच्या अवर्षण परिस्थितीमध्ये सर्व साखर कारखान्यांना खोडवा पिकांमध्ये वरील तंत्रज्ञानाचा वापर करून खोडव्यापासून जास्तीत जास्त ऊस पुढील हंगामासाठी उपलब्ध होऊ शकेल.

लेखक पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील निवृत्त ऊस शास्त्रज्ञ असून, अनेक ऊस वाणांचे संशोधक आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »