२, ३ जुलै रोजी NFCSF ची दिल्लीत परिषद आणि पुरस्कार वितरण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (NFCSF) वतीने नवी दिल्ली येथे २ आणि ३ जुलै २०२५ रोजी ‘कोऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह -2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारांचा वितरण सोहळाही होणार आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय अन्न पुरवठा व सार्वजनिक वितरण, ग्राहक व्यवहार, अपारंरपिक ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सन्मानीय अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री निमूबेन बंभानिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार असल्याचे महासंघाने पत्रकाद्वारे कळवले आहे.

विशेष पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, हरियाणाचे सहकारमंत्री डॉ. अरविंदकुमार शर्मा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचे ऊसविकास मंत्री अनुक्रमे लक्ष्मीनारायण चौधरी आणि शिवानंद पाटील हे उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे ही परिषद होणार आहे.

देशातील साखर उद्योग क्षेत्रासाठी दरवर्षी होणारी, ही परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण असते. महासंघाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार साखर उद्योग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. यानिमित्ताने साखर उद्योग प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होत आहे. गतवर्षीच्या परिषदेला केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »