‘भीमाशंकर’वरून निकमांचे शब्दबाण, बेंडे यांचाही प्रतिहल्ला

पुणे : विधानसभा निवडणूक संपली तरी आंबेगावचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी देवदत्त निकम यांच्यातील शीतयुद्ध सुरूच आहे. वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर नुकतेच शब्दबाण सोडले, तर त्याला कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचा नियमित नोंद केलेला ऊस भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने वेळेवर न तोडल्यास या कारखाना प्रशासनाला काळे फासण्याचा इशारा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिला आहे.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देवदत्त निकम बोलत होते. या पत्रकार परिषदेस शरद बोंबे, संजय बढेकर विनायक लोंढे आदी उपस्थित होते.
विधानसभेच्या निवडणुकीमुळे सहकारी साखर कारखाने उशिराने सुरु झाले. अनेक शेतकऱ्यांचा १९ ते २० महिन्यांचा ऊस शेतात तोडणीवाचून राहिला आहे. त्यामुळे उसाच्या पिकात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. उशिरा तोड झाल्याने शेतकऱ्याला अन्य पिके घेता येत नाही. गहू, कांदा ही पिके शेतकऱ्याला घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची कांदारोपे वाया गेली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. मी शेतकऱ्यांच्या बाजूने संचालक मंडळ बैठकीत पहिला हप्ता ऊस तोडणीसंदर्भात आग्रही भूमिका घेत आहे परंतु, सर्व संचालक एका बाजूने यासंदर्भात शेतकऱ्याची बाजू मांडत आहे. भीमाशंकर कारखान्यात वीज प्रकल्पातून तसेच इथेनॉलमधून उत्पन्न मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पहिला हप्ता मिळाला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाल्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात जळीत कपात केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, असे निकम म्हणाले.
कारखान्याच्या बदनामीचा कट : बेंडे

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आजारी पाडण्यासाठी देवदत्त निकम हे कुटिल डाव करीत आहेत. त्यांचे हे कटकारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, कारखाना व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ, कारखान्याला बदनाम करण्याचे षडयंत्र त्यांनी व त्यांच्या पक्षाने हाती घेतला असल्याचा आरोप भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केला आहे.
देवदत्त निकम यांनी भीमाशंकर कारखान्यावर भेट देऊन कारखान्याच्या कामकाजा संदर्भात काही आक्षेप नोंदवले व कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा दिला. या आरोपांना उत्तर देण्यासाठी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे, शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कारखान्याचे संचालक अंकित जाधव, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन रमेश खिलारी यांच्या उपस्थितीत मंचर येथे पत्रकार परिषद झाली.
बेंडे यांनी देवदत्त निकम यांच्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, भीमाशंकर कारखान्याची तोड ही ठरलेल्या नियोजनानुसार होत असते. यामध्ये कोणताही वशिला किंवा राजकारण केले जात नाही. तसेच, कारखान्याने पहिला हप्ता २६३० रुपये हा एफआरपीच्या धोरणानुसार दिला आहे. आजूबाजूच्या इतर कारखान्यांच्या तुलनेत भीमाशंकरचा दर चांगला आहे. तसेच, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारखाना सुरू केला हे म्हणणं चुकीचं आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी फक्त तेरा दिवस कारखाना उशिरा सुरू झाला सरकारने जाहीर केलेल्या तारखेलाच आपला कारखाना सुरू झाला आहे. यामध्ये कोणताही विलंब कारखान्याकडून झालेला नाही. सन २०२२ च्या लागवड हंगामात ३२३९ हेक्टरची नोंद कारखान्याकडे झाली.
पराग कारखान्यावरील आरोप चुकीचा
भीमाशंकरच्या ऊस पराग कारखान्याने तोडला हा आरोप देखील चुकीचा आहे. भीमाशंकरचा ऊस वेंकटेशकृपा, क्रांती शुगर, संत तुकाराम, विघ्नहर अशा अनेक कारखान्याने तोडला. शेतकरी आपला ऊस लवकर तुटून जावा, म्हणून स्वतः इतर कारखान्यांना ऊस देतात. यामध्ये पराग कारखान्यानेच भीमाशंकरचा ऊस नेला हे म्हणणे चुकीचे आहे. भीमाशंकर कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. आजचा बाजारभाव विचारात घेऊन शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. कारखाना बदनाम करण्याचे षडयंत्र देवदत्त निकम करत आहेत. त्यांना एवढच कारखान्यातील समजत असेल, तर बंद पडलेला बाजूचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना त्यांनी चालून दाखवावा, असे आव्हान यावेळी बाळासाहेब बेंडे यांनी केले.