साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करावी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – केंद्र सरकारने देशात ग्रीन हायड्रोजन या हरित इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठीचे स्वतंत्र अभियान सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी साखरेच्या उत्पादनाबरोबरच ग्रीन हायड्रोजन या हरित इंधन निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने आणि संधी या विषयावरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे व प्रदर्शनाचे उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या परिषदेत २७ देशांमधील २ हजाराहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

यावेळी या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, संस्थेचे सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडू पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, बी. बी. ठोंबरे आदी उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले, ‘एका बाजूला कृषी उत्पादनांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला असून अनेक कृषी उत्पादने मागणीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे त्यांना पुरेसा भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना त्यासाठी स्वतंत्र अनुदान द्यावे लागते आणि दुसऱ्या बाजूला आपण सुमारे ८० टक्के इतके पारंपरिक इंधन आयात करत आहोत.

देशातील साखर उद्योग हा पूर्णपणे ब्राझीलसारख्या देशावर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता, यापुढे केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे आपल्याला परवडणारे नाही. यासाठी साखर उद्योगाने आता साखरेऐवजी इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर अधिक भर देण्याची गरज आहे.’

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आता हायड्रोजन निर्मितीच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्याची गरज असून केवळ साखर उद्योगच नव्हे तर, देशभरातील कृषी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन सारखे इंधन तयार करण्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »