१८९ लोकसभा मतदारसंघांत ऊस महत्त्वाचे पीक
इथेनॉलचा विषय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा : गडकरी, डिझेलमध्येही इथेनॉल
नवी दिल्ली : देशातील १८९ लोकसभा मतदारसंघांमध्ये ऊस हे महत्त्वाचे पीक आहे, त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोलची (इबीपी) सरकारची महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राजकीयदृष्ट्याही तेवढाचा महत्त्वाचा आहे. या माहिमेला गती मिळाली नसती, तर १८९ मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या असत्या, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते बांधणी आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दिल्लीत मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले, ‘इबीपी मोहिमेचा उसाची बिले देण्याच्या कामात साखर कारखान्यांना मोठा हातभार लागला आहे. उसाची थकबाकी वेळेत दिली गेली नाही, तर नेत्यांना त्यांच्या मतदारसंघात जाणे अवघड झाले असते. असे 189 संसदीय मतदारसंघ आहेत जिथे शेतकरी ऊस पिकवतात आणि जर त्यांना त्यांची देणी मिळाली नसती, तर अवघड स्थिती निर्माण झाली असती.”
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची उपलब्धता कमी झाल्याने आणि इथेनॉलचे उत्पादन वाढल्याने भारतीय साखरेला चांगला भाव मिळत आहे. त्याचाही फायदा साखर कारखान्यांना झाला आहे. यापूर्वी साखर कारखानदार शेतकऱ्यांची उसाची बिले वेळेत देऊ शकत नव्हते. इथेनॉल उत्पादनासाठी सरकारने मोठे धोरणात्मक निर्णय घेऊन, त्याचा पाठपुरावा केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळू शकले आणि त्यामुळे आम्हालाही निर्धास्त राहता आले, असे गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्याकडे निर्देश करत, गडकरी म्हणाले, ‘पांडेजी, उत्तर प्रदेशात आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळत आहेत ना!’ पांडे उत्तर प्रदेशचे आहेत.
इतर पिकांमधून चांगले उत्पन्न मिळत नसल्याने, शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस घेत आहेत, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले, ‘फ्लेक्स इंधनावरील वाहनांची संख्या जशी वाढेल, तसे चांगली वातावरनिर्मिती होईल आणि रोजगाराच्याही अधिक संधी निर्माण होतील.’
डिझेलमध्येही इथेनॉल
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय, पुणे) या संस्थेने डिझेलमध्येही 15% इथेनॉल मिसळण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. ‘ या संस्थेने सादर केलेले चाचणी अहवाल आपण अभ्यासावा’, अशी विनंतीही गडकरी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना केली. सध्या केवळ पेट्रोलमध्येच इथेनॉल मिश्रणाला परवानगी आहे.