माझ्या वाहतूक खात्यामुळे ४० टक्के प्रदूषण : गडकरी
ग्रीन हायड्रोजन भविष्यातील प्रदूषणमुक्त जैविक इंधन
पुणे : ‘देशाला आजही ८५ टक्के इंधन आयात करावे लागत असून, त्यासोबतीने प्रदूषणाची समस्या वाढत आहे. देशातील ४० टक्के प्रदूषणाला माझे वाहतूक खाते जबाबदार आहे आणि त्याचे मला दु:ख आहे,’ असे वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले.
प्रदूषणमुक्त इंधनावर पर्याय शोधण्याची वेळ आता आली असून, ग्रीन हायड्रोजन भविष्यातील स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त जैविक इंधन असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूूट येथे आयोजित तिस-या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार होते. गडकरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, प्रशांत परिचारक, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
ग्रीन हायड्रोजनसारखे जैविक इंधन काळाची गरज असून, साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधननिर्मितीवर भर दिला पाहिजे. पेट्रोल आणि डिझेलसारख्या पारंपरिक इंधनाचा योग्य पर्याय म्हणून हे इंधन पुढे आले आहे. भविष्याचा विचार करता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे आपल्याला परवडणारे नाही.
म्हणूनच साखर उद्योगाने आता साखरेऐवजी इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मी विदर्भातील शेतकरी आहे. तिथे उसाची शेती करणे अवघड आहे. तिथेही ही संस्था सुरू झाल्याने विदर्भातील ऊस शेती वाढत असल्याचे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले.
यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, गिल्हेर्म नास्तारी, संचालक, डेटाग्रो (ब्राझील), डॉ. जर्मन सेरिनो, सचिव, आंतरराष्ट्रीय ऊस जैवतंत्रज्ञान संघ (आयसीएसबी, अर्जेंटिना), डॉ. मायकेल बटरफिल्ड, वैज्ञानिक व्यवहार व्यवस्थापक, (सीटीसी, ब्राझील), संजय अवस्थी, अध्यक्ष, ISSCT कौन्सिल आणि अध्यक्ष, द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (STAI), S.B.Bhad, अध्यक्ष, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (DSTA), एन चिनप्पन, अध्यक्ष, द साउथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ( SISSTA), साखर कारखानदार, संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक, संशोधन संस्थांचे प्रमुख, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेत देश-विदेशातील दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.