बीडची ओळख कष्टाने जगणारे ऊस तोडणी कामगार…
अलीकडे बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड चे निमित्तानं गुंडगिरी आणि राजकारण यांचे एकमेकाशी असलेले गडद क्रूर नाते महाराष्ट्रासमोर येते आहे.या रोजच्या बातम्यांतून तेथील गुंडगिरीचा अमानुष चेहरा हाच त्याच जिल्ह्याचा चेहरा आहे असे चित्र राज्यभर जाते आहे…जणू गावोगावी फक्त वाल्मीक आणि गुंडच आहेत….
वास्तविक हा महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी माणसांचा हा जिल्हा आहे…यांच्याईतके कष्ट बघुन हलून जायला होते..या गरिबांच्या कष्टाला हे गुंड बदनाम करतात.
दसरा झाला की लाखो ऊसतोड कामगार जगायला बाहेर पडतात आणि मे महिना संपताना ते गावाकडे परततात…
असा हा कष्टकरी लोकांचा हा जिल्हा आहे… हरामाने जगणारे वाल्मीक कराड सारख्या लोकांचा हा जिल्हा नाही हे लक्षात घेऊ या…
हे ऊसतोड कामगार किती कष्ट करून जगतात बघा...एक झलक...
हे कामगार पहाटेच निघालेत… बैलगाडीच्या किणकिणटापलीकडं रस्त्यावर कसलाच आवाज नाहीये… सारी घरं चिडीचूप… सन्नाटा… बैलगाडीत बाईच्या मांडीवर तिचं लहानगं पेंगुळलंय… त्याची झोपही धड पूर्ण झाली नाहीये… आणि थंडीत झोपही येत नाहीये. अंगात स्वेटर नाही की कानटोपी नाही. खोपटात थंडीत निजून राहावंसं वाटतंय… पण बापाच्या धाकानं गुपचूप उठून बैलगाडीत पहाटेच्या कडाक्यात गुमान चढलंय… निर्मनुष्य रस्त्यावरून गावातून जाताना पहाटे कडेच्या बंद घरांतून सुखात झोपलेल्या मुलांची तुलना ती आई नकळत आपल्या लेकरांशी करतेय… तिकडे स्वेटर, कानटोपी अन् दुलईत झोपलेलं लेकरू आणि इथं बैलगाडीत ठेचकाळत, थंडीत कुडकुडणारं तिचं लेकरू… ही तुलना करून दुःखी व्हायलाही तिला वेळ नाही… रात्रभर थंडी होती की नाही, हे तिला अतीव श्रमानं झोप लागल्यावर समजलं पण नाही… पहाटे थंडी वाढल्यावर रडत कुशीत शिरणारं लेकरू फक्त तिला जागं करतंय… पहाटे तीन वाजता थंडीनं अशरशः उच्छाद मांडल्यावर तिला उठावं लागलंय. पट्कन चहा करायला गॅसही नाही… काटक्या-कुटक्या कशातरी गोळा करून तिनं चहा केलांय… अंघोळीची चैन भागवायला इतकी लाकडं हाताशी नाहीत… तितका वेळ नाही आणि इतक्या थंडीत ते धाडसही नाही. तशातच आता स्वयंपाक उरकायचाय… लाईट नाही. तशा अंधारात विझणारी चूल सावरत कसा तरी स्वयंपाक करायचाय… पीठ भिजवायला पाण्यात हात घालवत नाहीये… पण करणार काय…?
भाजी चिरताना बोटं वाकडी होताहेत… कशी तरी स्वयंपाक नावाची वस्तू तयार झालीय… एवढी सगळी कामं एका तासात उरकायचीत… नवरा गाडी सज्ज करतोय. बैलंही कुरकूर करताहेत… थंडीत तेही गारठून गेलेत… मालकाच्या चाबकाची भीती फक्त त्यांना उठवतेय… इकडं लेकरं उठायला मागत नाहीत… कुरकुरताहेत… तिकडं शेजारच्या बैलगाड्या निघाल्यात… त्यामुळं तगमग वाढलीय… लेकराला उठवावंसंही वाटत नाही आणि नवरा चिडलाय… एखादा धपाटा टाकून तसंच लेकरू गाडीत टाकावं लागलंय… तिथं फडात पोहोचल्यावर या थंडीचा विचारही करायला वेळ नाही… लेकरं तशीच गाडीत टाकून आता ऊसतोड सुरू झालीय… लेकरांना मिळणारी आईची उबही आता नाही… थंडीनं हात वाकडे होताहेत… तसाच कोयता सुरू झालाय… आधार म्हणून वाळलेलं पाचट पेटवून दिलंय… उसाच्या फडात तर पाणी जवळ असल्यानं थंडी जास्तच झोंबते आहे… उसाचं टोकदार पातं अंगाला कापतंय… थंडीत त्या वेदना अधिकच बोचतात. तिकडं थंडी वाढल्यानं लेकरू बैलगाडीत रडायला लागलंय… त्याच्या अंगावर पांघरूण टाकून पुन्हा फडात. पुन्हा लेकराकडं… अशी तगमग… कशा तरी गाड्या भरल्यात आणि कारखान्यावर पोहोचतायत.. साखर कारखान्याची चिमणी वर धूर ओकत असते. खाली घरांची लांब रांगच रांग… एखाद्या कॉलनीसारखी ही ऊसतोड कामगारांची वस्ती…
नुकतेच कामावरून परत आलेत. आजचे काम पूर्ण केल्याचे समाधान चेहऱ्यावर आहे. तरीपण अजून गाडीचा नंबर लागयचाय. तिकडे गाडी नंबरला लावून आलाय… अंघोळीचे तापलेले पाणी आणून तिथेच दगडावर अंघोळ करतोय… बाईने थळात पुरुषाइतकं काम केलं तरीसुद्धा तिची घरच्या कामातून सुटका नाही… ती पुन्हा स्वयंपाकाला जुंपलीय. लहान पोरं तिने पाण्याला पिटाळलीत. पोरं शाळेत गेली का, हा प्रश्नही तिच्या लक्षात आला नाही. तशीच भाकरी करायला चूल पेटवलीय… तेवढ्यात झोळीतलं पोरगं उठलं. त्याला झोके देत चूल पेटवत पीठ मळायला घेतलंय… नवरा आता काममुक्त आहे. तो अजून दिवाळीचं अभ्यंगस्नान करण्याच्या थाटात निवांत अंघोळ करतोय… पोरं पाणी घेऊन आल्यावर एकाला झोका द्यायला बसवून मुलीला पुन्हा पाण्याला पाठवलंय… पहाटेपासून तिची ही तगमग चाललीय. स्वयंपाक कसा तरी झालाय. पोरं आणि नवरा जेवायला घालून ती आता बसलीय जेवायला. सगळं लक्ष आता धुण्याकडं लागलंय… त्यातच अजून अंघोळ राहिलीय… पुरुष-माणसांची ये- जा वाढलीय तरी तशीच अंगाला साडी गुंडाळून झोपडीमागच्या दगडावर अंघोळ करत्येय… कोण बघतंय, कोण नाही- ही लाज बाळगायलाही तिला वेळ नाही… नवरा केव्हाच बैलगाडीच्या रांगेकडे गेलाय. पोरं खेळायला…
तिने तसेच धुणं घेतलंय… संध्याकाळ होत आल्यानं थंडी वाढलीय… कारखान्याच्या लिमिटेड नळांवर हीऽऽ गर्दी उसळलेली… त्यामुळे रात्री अंधारातही धुणं धुवायचं… अंधार पडल्यावर थंडीत धुणं धुवायला आलीय. गर्दीत पाणी उडून थंडीत ओलीचिंब झालीय… अंधारात आली. नवऱ्याला हाक मारत्येय, पण तो दारू ढोसून आलाय. काही तरी बरळतोय. पोरं झोपलीत. दारूडा नवरा… त्याला शिव्या घालते, पण ऐकायला तो शुद्धीत नाही. धुणं वाळत टाकून अंग टाकते… पुन्हा पहाटे तीन वाजता कामावर जाण्यासाठी…
या कष्टाने जगणाऱ्या माणसांचा हा जिल्हा आहे, खंडणीवर जगणाऱ्या माणसांचा नाही.
–हेरंब कुलकर्णी