जयवंत शुगर्सला ‘एनएसआय’चा पुरस्कार

सातारा : केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या (NSI) वतीने धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कानपूर येथे ११ ऑक्टोबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्राध्यान्य देत आणि साखर उद्योगातील बदलत्या स्थितीचा अभ्यास करत नेहमीच उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे.
जयवंत शुगर्सने अल्पावधीतच साखर उद्योगात भरारी घेत साखरेबरोबरच अन्य उपपदार्थांची निर्मिती करत, सातत्याने आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. साखर उद्योगाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी जयवंत शुगर्सने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटने हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे.
११ व १२ ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेशातील कानपूर येथे नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट व उत्तरप्रदेश शुगर मिल्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषद व ‘साखर एक्स्पो’ आयोजित करण्यात आले असून, या परिषदेला विविध साखर उत्पादक देशांमधील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.