ऊस ट्रॉली-दुचाकी धडकेत एक ठार; एक गंभीर

धाराशिव : ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॉलीला दुचाकी धडकल्याने एक जण जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भाटशिरपुरा गावाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. पद्मसिंह नाईकनवरे (वय ४६) असे ठार झालेल्याचे नाव आहे. प्रदीप नाईकनवरे या जखमीला तात्काळ धाराशिव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील ढोराळा येथील पद्मसिंह मोहन नाईकनवरे व प्रदीप हरिश्चंद्र नाईकनवरे हे मंगळवारी दुपारी प्रशासकीय कामकाजासाठी येथील महसूल कार्यालयात आले होते. गावातील इतर पन्नासेक लोकांना गावाकडे परत पाठवून हे दोघेजण कार्यालयातच थांबले होते. कामकाज संपल्यानंतर सायंकाळी आपल्या दुचाकीवरून कळंब-ढोकी रस्त्यावरून ढोराळाकडे जात असताना भाटशिरपुरा गावाजवळ एका उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर त्यांची दुचाकी आदळली. यात पद्मसिंह नाईकनवरे (वय ४६) यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रदीप नाईकनवरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारार्थ धाराशिव येथे हलविण्या आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भाटशिरपुरा येथील तरूणांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. तसेच संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड यांनी तातडीने वैद्यकीय यंत्रणा सतर्क केली व कळंब उपजिल्हा रुग्णाल्याची रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली. यानंतर दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले करण्यात आले होते.
रिफ्लेक्टरचा प्रश्न वारंवार एैरणीवर!
ऊस वाहतूक करताना वाहनांना रिफ्लेक्टर न बसवणे आणि अन्य उपाययोजना न केल्याने या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. प्रशासनाने उस वाहतुकीची नियमावली, सूचना देऊनही याचे पालन होताना दिसत नाही. सध्या हंगाम सुरू असल्याने कारखान्यांना ऊस पुरवणारी शेकडो वाहने रस्त्यावर आहेत. यापैकी अनेक वाहनांनी सुरक्षा साधनांची काळजी घेतली जात नाही, यामुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे. यावर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.





