…तरच साखर उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल होईल : मंत्री गडकरी
लातूर : ऊस उत्पादक शेतकऱ्याने कमीत-कमी पाणी, खत आणिउत्पादन खर्च यातून अधिक उत्पादन मिळवले पाहिजे. शेती हे एक विज्ञान आहे. उद्योग केवळ साखरेपुरता मर्यादित राहू न देता इथेनॉल, इंधन आणि हवाई इंधन याकडे कारखानदारांनी लक्ष दिले पाहिजे. शेतकरी ऊर्जादाता बनल्याशिवाय साखर उद्योगाचे आणि शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यांच्या ४२ व्या गळीत हंगामाचा भव्य शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिरत्न बी. बी. ठोंबरे होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आ. गोविंद केंद्रे, अर्चनाताई पाटील-चाकूरकर, मा. खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी आ. बब्रुवान खंदाडे, गणेश हाके, शिवाजी माने, सुरेश बिराजदार, बबन भोसले यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यायचा असेल, तर शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे अत्यावश्यक आहे. हा प्रयोग यशस्वी करण्याची क्षमता अभिमन्यू पवार यांच्यात आहे ते निश्चित करतील. निळकंठेश्वर कारखाना सुस्थितीत आल्यावर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि या भागाची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल, असा ठाम विश्वासही मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.
आ. अभिमन्यू पवार यांनी राजकारणात मला नितीन गडकरी यांचा आशीर्वाद आहेच, पण देव आणि देवेंद्र यांचाही मला आशीर्वाद लाभला आहे. कारखाना सुरू करताना अनेक अडचणी आल्या, पण निळकंठेश्वराच्या कृपेने त्या दूर झाल्या. या हंगामात प्रती टन ऊस ३०११ रुपयांचा भाव दिला जाणार आहे. बी. बी. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनासह व सरकारच्या पाठबळामुळे हा निळकंठेश्वर साखर कारखाना नव्या जोमाने उभा राहिला असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.






