…अन्यथा संबंधित कारखान्यांवर कारवाई करणार

गाळप परवानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे साखर आयुक्तांचे आवाहन
पुणे : आगामी गाळप हंगाम कालावधीत राज्यातील साखर कारखान्यांनी संबंधित परवाना अधिकाऱ्यांचा गाळप परवाना घेतल्याशिवाय त्यांनी ऊस गाळप करू नये. कारखान्यांनी विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्यास सबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे.
गाळप परवाना प्रस्ताव ऑनलाइन भरणासाठी लॉगइन आयडी व पासवर्ड वापरून परवाना अर्ज करावा लागणार आहे. यासाठी राज्यात आगामी २०२५-२६ मधील गाळप हंगामात गाळप परवान्यासाठी साखर कारखान्यांनी १ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. त्यापूर्वी ते सादर करणे आवश्यक असल्याचे साखर आयुक्तांनी परिपत्रकाच्या माध्यमातून कळविले आहे. तसेच गाळप परवान्यासाठीचा गाळप कालबद्ध कार्यक्रमही कारखान्यांना देण्यात आलेला आहे.
काय आहे परिपत्रकात?
– परवाना फी व सुरक्षा अनामत रक्कम भरणा करावयाची आहे.
– मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा गतवर्ष २०२४-२०२५ मधील ऊस गाळपावर प्रतिटन पाच रुपयांप्रमाणे भरावयाचा आहे. तर साखर संकुल निधी हा गतवर्ष हंगाम २०२४-२५ मधील ऊस गाळपावर प्रतिटन पन्नास पैशांप्रमाणे भरावयाचा आहे.
– सहकारी साखर कारखान्यांनी शासकीय भागभांडवल, कर्ज व हमी शुल्क वसुलीसाठी प्रचलित पद्धतीप्रमाणे साखरेवर टॅगिंगद्वारे शासकीस वसुली प्रतिक्विंटल ५० रुपये व प्रतिक्विंटल २५ रुपयांप्रमाणे साखर विक्रीच्या रकमेतून वसूल करून शासकीय कोषागारात जमा करावी.
– मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्री समितीमधील निर्णय चालू वर्षाच्या गाळप हंगामाकरिता लागू राहतील. ऑनलाइन गाळप परवाना अर्ज मुदतीत सादर न करणे, गाळप परवाना प्राप्त करून न घेताच गाळप सुरू करणे तसेच अर्टीचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल.
– राज्यात यंदा हंगाम २०२५-२६ करिता सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी गाळप परवाना प्राप्त करून घेतल्याशिवाय गाळप हंगाम सुरू करू नये.