…अन्यथा  *त्या* कारखान्यावर आंदोलन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

गडहिंग्लज : तालुक्यातील बेरडवाडी परिसरात धान्यापासून अल्कोहोल निर्मिती करणारा कारखाना कार्यान्वित आहे. या कारखान्यामुळे परिसरातील पाणी प्रदूषित होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी या कारखान्याविरोधात तातडीने कारवाई करण्यासाठीचे निवेदन नुकतेच प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनावर माजी सभापती अमर चव्हाण, महादेव भोई, परशराम भोई, सुभाष भोई, रामा भोई व इतर नागरिकांच्या सह्या आहेत. कारखान्यावर कठोर कारवाई केली नाही, तर ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कारखान्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

बेरडवाडी येथे असलेल्या अल्कोहोल निर्मितीच्या कारखान्यामुळे यातील दूषित पाणी ओढे व नाल्यात सोडले जाते. परिसरातील बेरडवाडी, भुईवाडी, चव्हाणवाडी, मरगुद्रीवाडी अशा वस्त्या आहेत. त्यांना या प्रदूषणाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धान्य कुजवून अल्कोहोल निर्मिती होत असल्याने सदर कारखान्यातून प्रदूषण निर्गत करण्याची कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याने हे दूषित पाणी दारातून वाहत आहे. कारखान्याचा आवाज व बॉयलरमधील राख यामुळे वाडी-वस्त्यांवरील लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार मागणी करुनही संबंधित कारखान्याकडून दुर्लक्षच झाले आहे. तरी याप्रश्नी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »