… अन्यथा साखर कारखान्यांविरोधात संघर्ष : डॉ. अजित नवले

अहिल्यानगर : राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू आहे. संबंधित साखर कारखान्यांनी कारखान्यांनी पेमेंटमधून परस्पर कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया करु नये, तसे झाल्यास साखर कारखान्यांविरोधात संघर्ष करावा लागेल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी नुकताच दिला आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज ३० जून २०२६ च्या आत माफ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कर्जमाफी केवळ थकीत कर्जदारांची होते हा अनुभव आहे.
डॉ. नवले यावेळी म्हणाले की, उसाला रास्त पहिली उचल व भाव मिळावा यासाठी किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. आंदोलनाचा परिणाम म्हणून लवकरच पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल. मात्र असे होताना बऱ्याचदा सहकारी बँका कारखान्यांना संपर्क करून शेतकऱ्यांचे कर्ज ऊसाच्या पहिल्या हप्त्यामधून किंवा पेमेंटमधून वसूल करून घेतात. परिणामी असे शेतकरी थकीत कर्जदार न राहता नियमित कर्जदार बनतात व कर्जमाफीच्या योजनेतून वगळले जातात. त्यामुळे साखर कारखान्यांनी या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे कर्ज परस्पर ऊस पेमेंटमधून किंवा पहिल्या हप्त्यातून कापून घेऊ नये. जर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्यास जो असंतोष भडकेल त्याची जबाबदारी सुद्धा कारखान्यांवर राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.






