“कॉपशॉप” संकल्पनेच्या पुनरुज्जीवन प्रयत्न!

- सतीश देशमुख
शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी मधील शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाविना शहरातील गृह हौसिंग सोसायट्या मधील ग्राहकांना थेट पुरवठा करण्यासाठी कायम स्वरूपी अशी “कॉपशॉप” ही संकल्पना होती.
महाराष्ट्र शासनाने “अटल महापन विकास अभियानांतर्गत”, राज्यात 4 ऑक्टोबर 2018 रोजी “काॅपशाॅप” योजना सुरू करण्यात बाबत निर्देश दिले होते. तसेच महाराष्ट्र सहकारी विकास केंद्राने (एमसीडीसी) 2018 च्या सरकारी ठरावानुसार गृहनिर्माण संस्थांमध्ये सहकारी दुकाने स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले होते.
परंतु काही कारणास्तव ही योजना एक दोन अपवाद वगळता कागदावरच राहीली. अश्या पद्धतीने महाराष्ट्रात 200 “कॉपशॉप” चे जाळे उभे राहिल्यास शेतमालाला व महिला बचत गटाच्या उत्पादनाला कायमस्वरूपी व सातत्य असणारी विक्री व्यवस्था उभी राहील.
म्हणून आम्ही (श्री. साहेबराव खामकर, श्री. हनुमंतराव मोटे, श्री. दिलीप कापरे) गेले काही महिने ह्याचा पाठपुरावा करीत आहोत. त्याला श्री. सुहास पटवर्धन, अध्यक्ष, ‘महाराष्ट्र राज्य सहकारी गृह निर्माण संस्था महासंघ मर्यादित’ ह्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिले.

तसेच श्री. मंगेश तिटकारे, व्यवस्थापकीय संचालक, (MD) महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित (MCDC) ह्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्री. अजित चौगुले, संचालक विस्मा ह्यांनी विशेष सहकार्य केले.
त्या अंतर्गत शेतकरी/शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांच्या माध्यमातून ग्राहकांना स्वच्छ, ताजे, अद्ययावत कृषी वस्तू/उत्पादने पुरवण्यासाठी एक प्रणाली विकसित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
त्याचा मुख्य उद्देश सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध व ताजा भाजीपाला, अन्न धान्य, कडधान्य, डाळी, फळे, सेंद्रिय उत्पन्ने, तृणधान्य, डाळी, पीठ, मसाले, दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळावेत. तसेच स्वयंसहायता महिला बचत गटाची उत्पादने, पापड, लोणची, वाळवण, प्रक्रिया केलेले उत्पादने, पर्स व इतर गृहपयोगी वस्तु उत्तम दर्जाच्या व योग्य किंमतीमध्ये सभासदांना सोसायटी मध्येच मिळू शकतील. त्यामुळे सभासदांची वेळेची बचत तर होईलच आणि महिला, जेष्ठ नागरीक यांना सुकर होईल.
ह्या योजने अंतर्गत “Farm to Fork” म्हणजेच थेट शेतीमधून उत्पादित केलेला शुद्ध, सात्विक, निर्भेळ शेत माल ग्राहकांच्या दारापर्यंत उपलब्ध होईल.
‘भीमथडी’, ‘सरस’, ‘पवनाथडी’ अश्या प्रासंगिक प्रदर्शना पेक्षा कायम स्वरूपी अशी विपणन नेटवर्क विकसित करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात मूल्य वाढवणे हा उद्देश आहे.
ही शॉप्स केवळ शेती-ताज्या उत्पादनांची नियमित उपलब्धता सुनिश्चित करणार नाहीत तर शहरी समुदायांमध्ये शेतकरी-ग्राहक संबंध देखील निर्माण करतील. आम्हाला विश्वास आहे की या उपक्रमाचा फायदा शेतकरी आणि रहिवासी दोघांनाही होईल, तसेच महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला बळकटी मिळेल. तसेच सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहील.
नुकतीच आमची ‘महाराष्ट्र राज्य सहकारी गृह निर्माण संस्था महासंघ मर्यादित’ च्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर’ च्या मीटिंग मध्ये चर्चा झाली व पुढील कार्यवाही साठी सकारात्मक निर्णय झाले.
(लेखक शुगर इंडस्ट्री टास्क फोर्सचे संस्थापक आहेत.)




