केन ॲग्रो कारखान्याकडून १८.८३ कोटींची थकबाकी वसूल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : कर्जवसुलीसाठी संघर्ष करणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कडेगाव येथील केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. साखर कारखान्याने आपल्या थकीत कर्जाचा पहिला हप्ता १८ कोटी ८३ लाख रुपये व्याजासह बँकेत जमा केला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) मंजूर केलेल्या ‘ॲक्शन प्लॅन’नुसार ही वसुली करण्यात आली आहे. मार्च २०२२ अखेर केन ॲग्रो कारखान्याकडे जिल्हा बँकेचे व्याजासह एकूण २२५.५५ कोटी रुपये थकीत होते. लवादाच्या निर्णयानुसार, हे कर्ज पुढील सात वर्षांत टप्प्याटप्प्याने फेडायचे आहे.

नियोजित वेळापत्रकापेक्षा हप्ता भरण्यास विलंब झाल्याने बँकेने या रकमेवर अतिरिक्त व्याजही वसूल केले आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार पहिला हप्ता जमा झाला असून, आता दुसरा हप्ता मार्च २०२६ मध्ये देय असेल. दरम्‍यान, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराववाघ यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीच्या अपेक्षेने अनेक शेतकरी परतफेडीकडे पाठ फिरवत असताना, कारखान्याकडून झालेली ही मोठी वसुली बँकेसाठी महत्त्वाची आहे. केन ॲग्रोच्या १८.८३ कोटींच्या पहिल्या हप्त्याला काहीसा विलंब झाला होता, त्यामुळे आम्ही त्यावर विलंब शुल्क(व्याज) आकारले आहे. ही रक्कम बँकेत जमा झाली असून, लवादाच्या निर्णयानुसार पुढील सर्व हप्ते वेळेत वसूल केले जातील.”

सांगली जिल्हा बँकेसाठी ही वसुली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण यामुळे बँकेच्या थकीत कर्जाचे (NPA) प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »