अडचणीच्या काळात साखर कारखान्यांनी पाळायची पथ्ये!

“साखर कारखानदारी आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना साखर कारखाने व साखर कारखान्यांचा सेवक वर्ग यांच्या एकमेकांबद्दल असलेल्या जबाबदारी बद्दलचा उहापोह ….! “
ऊसाची FRP व साखरेची MSP केंद्र शासनाकडून प्रति वर्षी जाहीर केली जाते. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार ज्या ज्या वेळी ऊसाची FRP जाहीर केली जाईल, त्या त्या वेळी वाढ FRP च्या प्रमाणात साखरेची MSP वाढविली पाहिजे. FRP व MSP यांचे लिंकिंग असले पाहिजे.
परंतु गेल्या पाच वर्षातील अनुभव पाहिल्यास केंद्र शासनाने सन २०१९-२० ला ₹२७५०/- असलेली FRP वेळोवेळी वाढवून २०२४-२५ साठी ३४००/- व पुढील २०२५-२६ साठी परत ₹१५० ने वाढवून ती ३५५०/- प्रति टन केली आहे; परंतु साखरेची MSP मात्र आश्चर्यकारकपणे आहे तेवढीच ₹३१००/- क्विंटल ठेवली आहे.
साखरेचा उत्पादन खर्च जवळ जवळ ₹४३००/ क्वि. पर्यंत गेलेला असून पुढील वर्षी तो परत वाढणार आहे. बाजारात साखरेस सरासरी ₹३५००/- क्वि. पर्यंत दर मिळतो आहे. म्हणजे प्रति क्वि. ₹ ८००/- इतका तोटा सहन करावा लागत आहे. तोटा वाढल्याने कारखान्यांना उणे नेटवर्थ/NDR च्या प्रश्नाना तेांड द्यावे लागत आहे. कायद्यातील तरतूदीमुळे कर्जे काढून FRP च्या रक्कमा अदा कराव्या लागत आहेत. बँका जादा कर्जे देणेस तयार नाहीत.

कामगारांचे पगार, व्यापारी बिले, कर्जांचे हप्ते थकले आहेत. त्यात निसर्गाच्या लहरीपणाचा मार बसतोय. पाऊस जादा झाल्याने प्रति हेक्टरी ऊसाचे उत्पादन घटून कारखान्याना गाळप क्षमते प्रमाणे ऊस उपलब्ध न झाल्याने गाळप हंगाम १०० दिवसात आटेापता घ्यावा लागला. ३ महिने काम व १२ महिन्याचा पगार, बैठ्या खर्चात वाढ, व्याज खर्चात वाढ….. परिणामी एकूण उत्पादन खर्चात वाढ होऊन कारखान्यांचे तोटे वाढत निघाले आहेत. कामगार पगार थकीत राहू लागल्याने मॅनेजमेंट व कामगार युनियन संबंध बिघडत आहेत.
शासनाकडे MSP वाढीबाबत साखर संघ, फेडरेशन मार्फत प्रयत्न सुरू आहेत पण केंद्र शासनाकडून अद्यापी निर्णय प्रलंबित आहेत.
अशा या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यासाठी आपल्या हातात जो पर्याय उरतो तो म्हणजे स्वतःला शिस्त लावून घेवून शक्य तितक्या प्रमाणात खर्चात बचत करणे. ₹१ वाचविले म्हणजे ₹ १ मिळविल्यासारखे आहे.
अ) तेंव्हा मॅनेजमेंट कडून घ्यावयाच्या खबरदाऱ्याबाबत प्रथम विचार करू…….
१) शक्य तितक्या प्रमाणात कामगारांचे पगार वेळेत कसे हेातील या दृष्टीने आर्थिक नियेाजन करणे.
२) सेवक भरती गरजे प्रमाणेच करणे. भरती करताना तांत्रिक क्षमतेकडे लक्ष देणे म्हणजे त्याचा एकूण उत्पादकतेवर चांगला परिणाम होईल.
३) ॲाफ सिझन मध्ये कायम कामगारांवरच कामे आटोपून घेण्यास अधिकारी वर्गास सक्त सूचना देणे.
४) विनाकारण रोजंदारीवरील तात्पुरती भरती करू नये.
५) प्रत्येक महिन्याच्या वेज बिलांवर सविस्तर चर्चा करून कोठे विनाकारण खर्च हेात नाही याची खातरजमा करणे.
६) ॲाफ सिझन कामाचे नियेाजन अधिकारी वर्गाकडून आगावू मागवून घेणे.
७) तंत्रशुद्ध खरेदीची अंमलबजावणी करून वेळेत चांगल्या प्रतीचा माल उपलब्ध करून देणे.
८) Inventory Management कडे लक्ष ठेवून जादा स्टेाअर वाढून INVENTORY CARRYING COST वाढणार नाही यांवर कटाक्षाने लक्ष देणे.
८) साखर, व उप पदार्थ विक्री वेळेत व योग्य किंमतीत करून चालू खात्यावरून व्याजाचे बेाजा कमी करणे.
९) आता बाजारात सर्व प्रकारचा माल सहज उपलब्ध होत असल्याने जरूरी प्रमाणे डिलीव्हरी शेड्यूल देवून परचेस ॲार्डर्स फायनल करणे.
९) शक्यतेा ॲडव्हान्स देण्याचे टाळावे
१०) चांगल्या व्हेंडर्सची लिस्ट तयार करून, त्यांच्याशी घासाघीस करून माल खरेदी करावा.
१०) कामातील शिस्ती बाबत अधिकारी वर्गास पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. तेथे राजकीय बाबी आणू नयेत.
११) सेवक वर्गाशी सध्यस्थिती बाबत सतत चर्चा करून परिस्थितीत जाणीव करून द्यावी.
१२) युनियनला दिलेला शब्द पाळण्यात यावा जेणे करून त्यांच्यामध्ये विश्वासार्हता निर्माण हेाईल.
१३) नियमा प्रमाणे वेळच्या वेळी प्रमेाशन्स देण्यात यावी.
१४) कामगाराना उत्पादकता वाढीचे दृष्टीने कांही चर्चा सत्रे आयोजित करावी.
१५) अत्यंत कुशल कामगिरीसाठी बक्षीसे द्यावी.
ब) सेवक वर्गाच्या कारखान्यासंबंधी जबाबदाऱ्या
१) प्रत्येकाने आपापल्या कामांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे. आपल्या निष्काळजी पणामुळे प्लँटमध्ये खोळंबा होणार नाही याची दक्षता घेणे.
२) जरूरी पेक्षा जादा सेवक वर्ग मागणे नाही.
३) ॲाफ सिझन मध्ये कायम सेवकावरच कामे वेळेत पूर्ण करणे
४) ओव्हरटाईमची वेळ येवू नये.
५) संपूर्ण रजा रेाटेशन पध्दतीने उपभेागणे.
६) काटेकोर Preventive Maintenance Program तयार करून वेळेत कामे पूर्ण करणे
७) सर्व विभागामध्ये सामंजस्य राखणे
८) एकमेकांचे विभागातून अपु-या कामाबद्दल सहकार्य करणे.
९) कारखान्याच्या आर्थिक अडचणींची माहिती घेवून शक्य तेथे सहकार्य करणे
१०) संपासारखे टोकाचे हत्यार विचाराअंती वापरणे.
११) आपल्या कामाचा वेळा पाळणे.
१३) अधिकाऱ्यांना त्यांच्या नियेाजनात सहकार्य करणे
१४) नवीन तंत्रज्ञाना बाबत चर्चासत्र आयोजित करणे.
१५) आपले कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न करणे
१६) मशिनरी दुरूस्ती वेळी लागणारा नवीन माल खात्री करून वरिष्ठांचा सल्ला घेवूनच बदलणे
१७) स्क्रॅपचे वेगवेगळे ग्रुप तयार करणे व माल वजनावरच विकणे.
१८) वर्ष अखेरीस स्टोअर मालाची प्रत्यक्ष मेाजदाद करण्यास स्टोअर कर्मचाऱ्यांना मदत करणे.
१९) वर्ष अखेरीस कमी/जादा मालाचा रिपेार्ट करणे.
२०) ॲाफ सिझन कामे झाल्यावर सर्वानी मिळून कारखान्याची स्वच्छता मोहीम राबविणे.
२१) कारखान्याचे आवारात नियमितपणे आपआपल्या विभागाने स्वच्छता राखणे.
याप्रमाणे कार्यवाही करून आपल्या हातात असलेल्या बाबींचा प्रामाणिकपणे निपटारा केल्यास कारखान्याचे कामकाज सुरळीत सुरू राहील आणि त्याचा फायदा सर्वच सबंधित घटकांना होईल, यात शंका बाळगण्याचे कारण नाही असे मला वाटते .
(लेखक पी. जी. मेढे : माजी व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड; साखर उद्योग विश्लेषक, कोल्हापूर)





