साखर घोटाळा : पद्मसिंह पाटील, कै. पवनराजे यांची निर्दोष मुक्तता
धाराशिव : ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथील कथित साखर घोटाळा प्रकरणी कारखान्याचे तत्कालीन चेअरमन पवनराजे निंबाळकर (सध्या हयात नाहीत), माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची धाराशिव येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2002 साली सीआयडीने तपास केल्यानंतर दाखल झालेल्या या प्रकरणात तब्बल 21 वर्षानंतर निकाल लागला आहे.
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील साखर घोटाळ्याप्रकरणी 2002 मध्ये सीआयडीने तपास केला होता. त्यानंतर सीआयडीने कारखान्याच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल लागला असून, तेरणा कारखान्याचे तत्कालीन संबंधित पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.
सुनावणी दरम्यान पवनराजे यांची हत्या झाली. डॉ पद्मसिंह पाटील, पवनराजे निंबाळकर, रामेश्वर कारवा, शिवदास होनमाने, तानाजी शेंडगे, विवेक कुलकर्णी, राधेश्याम सोमाणी, मुकेश ओसवाल, ललित ओसवाल, अशोक शिनगारे, पवनकुमार झा उर्फ शर्मा, राजीव पाठक, मुकुंद पाठक, प्रमोद दिवेकर,मंगल बाळासाहेब पाटील, अब्दुल रशीद काझी यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
याप्रकरणात ॲड विजयकुमार शिंदे, पंडीत नळेगावकर, विश्वजीत शिंदे, निलेश बारखेडे, विष्णु डोके सुग्रीव नेरे, मडके व गोसावी यांनी काम पाहिले.
अॅड. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेरणा शेतकरी साखर कारखान्यातून साखर विक्रीसाठी २००१ निविदा मागविल्या होत्या. संचालक मंडळाने मुंबई येथील रिगल इनपेक्स यांच्या निविदेला मान्यता दिली. परंतु, कोलकाता येथील व्यापाऱ्यांना फ्री सेलची साखर दिली. चुकीच्या पद्धतीने साखर विक्री करून ४८ लाखांचा संचालक मंडळाने फायदा करून घेतला. तसेच कारखान्यास ९४ लाख ५९ हजारांचा तोटा झाला, अशा स्वरूपाच्या फिर्यादीवरून कलम ४०६,४०९,४६५,४७२,१०९, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल झाला होता.