‘पांडुरंग’ कडून शेतकऱ्यांचा सन्मान

उसाच्या एफआरपीसोबत साखरेचे दरही वाढवावेत : परिचारक
सोलापूर: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने उत्कृष्ट ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
देशभरातील साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडलेला असताना केवळ उसाची एफआरपी (न्याय्य व लाभदायी किंमत) वाढवून प्रश्न सुटणार नाही, तर साखरेचे दरही वाढवणे आवश्यक आहे, अशी ठाम भूमिका कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी यावेळी मांडली. ते ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, उमेश परिचारक, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, सभासद, अधिकारी उपस्थित होते.
सभेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष परिचारक म्हणाले की,
“आज शेतकऱ्यांच्या हाती जास्त पैसे पडावेत म्हणून केंद्र सरकार एफआरपी वाढवते; मात्र बाजारात साखरेला समाधानकारक भाव न मिळाल्यास कारखान्यांचे अर्थकारण कोलमडते. अशा परिस्थितीत कारखान्यांना उसाचे पैसे वेळेत देणे कठीण बनते. त्यामुळे एफआरपीसोबत साखरेच्या दरवाढीचाही विचार सरकारने करणे गरजेचे आहे.”
त्यांनी यावर भर दिला की, परकीय चलन वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना स्थैर्य मिळवून देण्यासाठी साखर उद्योगाला तातडीने धोरणात्मक मदत आवश्यक आहे.
कारखान्याच्या कामकाजाचा आढावा
- सभेत कारखान्याच्या मागील वर्षातील कामकाजाचा तपशील मांडण्यात आला.
- उत्पादन खर्च, विक्री, नफा-तोटा या सर्व बाबींचा हिशेब सभासदांसमोर ठेवण्यात आला.
- कारखान्याच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाचे केलेले प्रयत्न अधोरेखित करण्यात आले.
शेतकऱ्यांचा गौरव : पुरस्कार वितरण
‘पांडुरंग ऊस भुषण’ व ‘पांडुरंग आदर्श शेतकरी’ पुरस्कारांचे वितरण चेअरमन, माजी आमदार परिचारक यांचे हस्ते करण्यात आले. ‘पांडुरंग ऊस भुषण’ साठी रक्कम रु.१ लाख १ हजार १११ रुपये व ‘पांडुरंग आदर्श शेतकरी’ पुरस्कारासाठी रक्कम रु. २५ हजार १११ रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व फेटा असे स्वरूप आहे. गळीत हंगाम २०२४-२५ साठीचा ‘पांडुरंग ऊस भुषण’ पुरस्कार पळशी गांवचे सभासद शेतकरी सोमनाथ मोरे यांना प्रदान करण्यात आला.
‘पांडुरंग आदर्श शेतकरी’ पुरस्कार पंढरपूर गटातून खर्डी गावचे शिवाजी रोंगे, देगांव गटातील
रोपळेचे सौदागर कदम, चळे गटात विभागून चळेचे रामचंद्र गायकवाड व मुंढेवाडीचे अनिल शिंदे, भाळवणी गटातील भाळवणीचे शुक्राचार्य गवळी, भोसे गटातील आव्हे गावाचे विजय पाटील, करकंब गटातील सांगवीचे विजय जाधव यांना प्रदान करण्यात आले.
भविष्यातील अपेक्षा
सभेत सभासदांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी अधिक यांत्रिकीकरण, ऊस उत्पादकांना मार्गदर्शन, इथेनॉल उत्पादन वाढवणे आणि परस्पर सहकार्य या मुद्द्यांवर सूचना मांडल्या.