ज्यांच्या पाठीशी ‘पांडुरंग’ तेच आमदार : प्रशांतराव परिचारक

१२ ते १३ लाख मे. टन ऊस उपलब्ध होणार
पंढरपूर : गेल्या अनेक दिवसांपासून मी मंगळवेढा, माढा, सांगोला व मोहोळ या चार तालुक्यांत मतदारसंघांचा दौरा करत आहे. या मतदारसंघात पांडुरंग परिवाराचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्यामुळे पांडुरंग परिवार ज्या बाजूने असेल तोच आमदार होणार आहे, असे उद्गार पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले.
पांडुरंग कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ च्या ३४ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखाना स्थळावर पांडुरंग परिवाराचे संस्थापक कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांची ८९ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, दिनकर मोरे, दाजी पाटील, दिलीप चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, बाळासाहेब यलमार, तानाजी वाघमोडे, भगवान चौगुले यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित उपस्थित होते. पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी अनेक संस्था काढून उभ्या केल्या. कायम संस्थेचे व सभासदांचे हित जोपासत विश्वस्त म्हणून त्याकडे पाहिले. म्हणून आज प्रत्येक संस्था नावारूपाला आल्या आहेत. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श नुसारच आम्ही वाटचाल करत आहोत.
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी म्हणाले की, चालू गळीत हंगामासाठी १४ ते १५ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. त्यामधून १२ ते १३ लाख मे. टन उपलब्ध होणार होईल. कारखान्यातील सर्व कामे झाली असून, कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे. शासनाने १५ नोव्हेंबर पासून ऊस गाळपाची परवानगी दिल्यामुळे आम्ही शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून गाळप शुभारंभ करणार आहोत.
स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या ८९ वी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याबद्दल भावना व्यक्त करत प्रशांतराव परिचारक म्हणाले की, महान तत्त्ववेत्ता चाणक्य काम करत असताना त्यांच्याकडे दोन समई होत्या. ते सरकारी काम करत असताना सरकारी समई लावायचे व घरगुती काम करत असताना स्वतःची समई लावायचे. ही त्यांची काम करण्याची पद्धत होती. तीच पद्धत स्व. सुधाकरपंत यांनी वापरत कायम काटकसरीचे धोरण अवलंबले. संस्था टिकवून सभासद, शेतकरी, कामगार यांच्या जीवनात चैतन्य निर्माण केले.
या आठवणी सांगत असताना प्रशांतराव परिचारक यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.