ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देणारच – पंकजा मुंडे
बीड : आजही महिलांना लेकरे पाठीवर बांधून ऊस तोडावा लागतो, ही परिस्थिती मला बदलायची आहे. कितीही वर्षे लागली तरी पण आता ऊस तोडणाऱ्या मजुरांना आणि त्यांच्या कुटुंबाला मला न्याय मिळवून द्यायचा आहे, अशा शब्दांत भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात विश्वास व्यक्त केला.
सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर शनिवारी पारंपरिक व ऐतिहासिक दसरा मेळावा लाखो उपस्थितांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खा. सुजय विखे, माजी मंत्री सुरेश धस, माजी आ. भीमराव धोडे, आ. मोनिका राजळे, आ. नमिता मुंदडा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
आ. पंकजा मुंडे म्हणाल्या, या मेळाव्याला अठरापगड जातीचे लोक आले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे आले आहेत. मी तुम्हाला साष्टांग दंडवत घालते, कारण माझ्या बापाने मला तुमच्या झोळीत टाकले आहे. तुम्ही मला जिंकल्यानंतर इज्जतच दिली. पण पराभवानंतर त्याहून अधिक इज्जत दिली. आता मी तुम्हाला इज्जत देण्यासाठी सर्व ठिकाणी फिरणार असून अठरापगड लोकांच्या मान-सन्मानासाठी आपल्याला डाव खेळायचा आहे ऊसतोड कामगारांना यावर्षी मोठी भाववाढ आपण केली. त्यामुळे आता मतदान केल्याशिवाय आणि मी म्हटल्याशिवाय ऊस तोडायला जायचे नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
संघर्षाच्या काळात आपण एकत्र – धनंजय मुंडे
दसरा मेळावा हा संत भगवानबाबांचा आहे, गोपीनाथ मुंडे यांचा आहे आणि पंकजाताई मुंडे यांचा आहे, बारा वर्षांनंतर मी मेळाव्याला आलो आहे. मात्र या बारा वर्षांत मी कधीच दुसरा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे प्रतिपादन दसरा मेळाव्यात बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
आपला मेळावा विचाराचा मेळावा आहे. भगवान गडाच्या भूमिपूजनाला त्यावेळी १९६० ला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी संत भगवान बाबांच्या मनात प्रश्न आला, गडाला नाव काय देऊ? तेव्हा चव्हाण म्हणाले, तुमच्या नावातच भगवान आहे. त्यामुळे गडाला भगवान नाव द्या. आमच्या नशिबात संघर्ष आहे. तुमच्या सर्वांच्या नशिबातही संघर्ष आहे. अशा संघर्षाच्या काळात आपण एकत्र आहोत ही अभूतपूर्व गर्दी सांगत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.