‘घोडगंगा’चे हक्काचे पैसे कसे मिळत नाहीत तेच पाहतो : पवारांचा इशारा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : अशोक पवार यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्या, मग मी पाहतो रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याचे हक्काचे पैसे थांबतात ते…., असा खणखणीत इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला.

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोकबापू पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. काही माणसं बाहेरून येऊन घोडगंगा साखर कारखाना कसा सुरू होतो ते मी पाहतो, असे म्हणतात. लोकसभा निवडणुकीवेळी एका नेत्याने अमोल कोल्हे कसा निवडणूक येतो ते बघतो असे सांगितले, पण त्यानंतर लोकांनी जबाबदारी घेतली अन् लाखोंच्या मताधिक्क्यांनी निवडून दिले, तसेच अशोक पवार यांना निवडून द्या, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोपरखळी मारली.

शरद पवार म्हणाले, आपल्याकडे असलेल्या सत्तेचा वापर हा लोकांचा संसार फुलविण्यासाठी करायचा असतो, पण हल्ली महाराष्ट्रामध्ये जे लोक सत्तेत आहेत. त्यांनी ठरवले की येथील कारखान्याला मंजूर असलेले कर्जाचे पैसे द्यायचेच नाहीत. मी बँकेची बैठक घेतली त्यावेळी बँकेने सांगितले की, घोडगंगेला पैसे देता येतील, काही अडचण नाही. घोडगंगापेक्षा जास्त अडचणीत असलेल्या सहा कारखान्यांना कर्ज दिले, घोडगंगा कारखान्याला कर्ज देण्यात काहीही अडचण नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काहीच अडचण नाही असं म्हणता मग पैसे का देत नाही? असे मी विचारलं, त्यावेळी त्यांनी सांगितले की, पैसे आहेत मात्र राज्य सरकारने अडवले आहे. मी घोडगंगाला कर्ज मिळावे यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेलो. त्यांनीही माझी अडचण आहे. तुम्ही समजून घ्या, याचाच अर्थ असा आहे की, त्यांच्यावर कुणीतरी कारखान्याला कर्ज मिळू नये यासाठी दबाव टाकत होते. कर्ज मिळू नये यासाठी असा दम देणारा महाराष्ट्रातील नेता कोण हे तुम्ही समजून घ्या.

यशवंत सहकारी साखर कारखान्याबाबत बोलताना ते म्हणाले की, शिरुर मतदारसंघाला जोडलेला हवेली तालुक्यातील काही भागातील शहरीकरण वाढल्यामुळे या परिसरातील उसाचे क्षेत्र कमी झाले व त्याचा परिणाम म्हणून हवेलीमध्ये असणारा साखर कारखाना अडचणीत आला. साखर कारखानदारी चालू राहावी यासाठी सरकारकडून जी मदत मिळत असते ती मदत सर्वच कारखान्यांना समान स्वरूपात मिळाली पाहिजे. मी एनसीडीसीचा दहा वर्षे अध्यक्ष होतो, त्या काळामध्ये कारखान्यांना कर्ज देत असताना कधीही भेदभाव केला नाही. सुजाता व अशोक पवार हे वाहून घेणारी माणस आहेत. त्यांच्यावर अनेक संकटे आली असतानाही ते माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे रहा. मोठ्या मताधिक्क्याने अशोक पवार यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन पवार यांनी केले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »