काका-पुतण्यातील दुफळीचे परिणाम खालपर्यंत

सोलापूर : ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय दुफळीचे परिणाम पार खालच्या स्तरावर झिरपल्याचे आणि तेही विचित्र वळणार जात असल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत दिसून येत आहेत. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणामध्ये तर या दुफळीचा नवाच रंग दिसून आला. त्याची सहकार आणि साखर क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.
लोकनेते रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत, यापूर्वी नवा राजरंग दिसून आला होता, त्यात आता विठ्ठल कारखान्याची भर पडली आहे.
त्याचे झाले असे की, या कारखान्याच्या चेअरमन सह संचालक मंडळाविरोधात राज्य सहकारी बँकेच्या तक्रारीवरून पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संचालक मंडळाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यांना जामीनही मिळाला. मिळाला त्याचा लाभ एकमेव संचालक समाधान काळे यांना झाला नाही. कारण, ते अजित पवार गटाचे आहेत आणि चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह बाकी सर्व संचालक मंडळ शरद पवार गटाचे आहे.
संचालक मंडळाने सामुदायिक अर्ज करताना, नेमके काळे यांचे नाव यादीतून वगळले. त्यामुळे काळे यांना स्वतंत्रपणे न्यायालयात जामीन अर्ज करावा लागला. त्यांना इतरांप्रमाणे अटकपूर्व जामीन मिळाला. पण या घटनेची चर्चा रंगू लागली आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे सुमारे ४३० कोटी रुपयांचे कर्ज असून त्यापैकी परताव्याचे करार केल्यानुसार २०२२-२३ सालातील ५३ कोटी रुपये कर्ज भरणे आवश्यक असताना संचालक मंडळाने ते भरलेले नाहीत. त्यामुळे राज्य सहकारी बँकेच्या वतीने प्राधिकृत अधिकारी घनवट यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह सर्व २० संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, संचालक मंडळाच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज ठेवण्यात आला होता. सुरुवातीला चेअरमन अभिजित पाटील यांचा, तर १८ संचालकांचा जमीन अर्ज नंतर मंजूर झाला. परंतु अजितदादांना मानणाऱ्या भालके- पाटील गटाचे एकमेव संचालक असलेल्या समाधान काळे यांचा जमीन अर्ज सादर केलाच नव्हता.
आपण संचालक मंडळात आहोत आणि सर्वांसोबत आपलाही जामीन होईल अशा समजात असलेल्या समाधान काळे यांना पोलिस शोधत होते. फोन करून त्यांचा थांगपत्ता घेत आहेत हे लक्षात येताच समाधान काळे यांना आपल्याला संचालक मंडळाने वगळल्याचे समजले. त्यानंतर काळे यांनी न्यायालयात अटकपूर्वसाठी अर्ज केला. त्याला गुरुवारी मंजूरी मिळाली.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या २० पैकी १९ संचालक हे अभिजित पाटील यांचा पॅनेलमधून विजयी झालेले आहेत. अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात आहेत तर या संचालक मंडळातील समाधान काळे हे एकमेव संचालक अजित पवार गटाचे आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या संचालक मंडळाने अजित पवार गटाच्या एकमेव संचालकास वगळले अशीही चर्चा सुरु झाली आहे.