पुणे जिल्ह्यातील बेशिस्त ऊस वाहतूकदारांवर पोलिसांची कारवाई

पुणे : जिल्ह्यातील भिगवण-बारामती रस्त्यावर बेफिकीरपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. यामध्ये ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर व ट्रॉलीचा समावेश आहे. कारवाईत तब्बल १२ ट्रॅक्टरवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. बेजबाबदारपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाढत असलेले अपघात रोखण्यासाठी भिगवण पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान, वाहतुकीचे नियम मोडल्यास संबंधित चालकांवर दंडात्मक, तसेच कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांच्या तपासपथकाने यावेळी देण्यात आला आहे.
या मोहिमेदरम्यान, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर व ट्रॉलींची पोलिसांनी कसून तपासणी केली असता अनेक ट्रॅक्टर व ट्रॉलींवर पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर व रेडियम नसणे, वाहन क्रमांक नसणे, परवाना व कागदपत्रांचा अभाव, मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावून वाहन चालवणे, असे गंभीर प्रकार आढळून आले आहेत.
- अपघात टाळण्यासाठी चालकांनी काय काळजी घ्यावी?
– वाहन विमा, ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड आदी कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावीत.- दारू पिऊन वाहन चालवू नये.वाहन बिघाड झाल्यास रस्त्याच्या कडेला थांबवून टायरला स्टॉपर लावणे.चालत्या वाहनांवर मोठ्या आवाजात गाणी वाजवू नये.वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावावा.
- वाहनांवर साखर कारखान्याचे नाव, चालकाचा संपर्क क्रमांक व रक्तगट नमूद करावा.
- चालकांनी रिफ्लेक्टर जॅकेटचा वापर करावा.






