कामगारांसाठी कारखानदार व कामगार संघटनांचा सकारात्मक विचार गरजेचा

शरद पवार : पन्हाळा येथे साखर कामगार प्रतिनिधी मंडळ कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरास प्रारंभ
सातारा : कारखान्यात कामगार संख्या दोन हजार होती. आज त्याच कारखान्याची गाळप क्षमता वाढली कामगार संख्या तीच आहे. त्यामुळे कामगाराला दिवसेंदिवस नवीन व्यवसाय शोधावा लागत आहे, त्यामुळे साखर धंद्यातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कारखानदार व कामगार संघटनांनी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर कामगार संघटना मजबूत करणे गरजेचे असल्याचे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. पन्हाळा येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या तीनदिवसीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अर्थमंत्री, आमदार जयंत पाटील होते. व्यासपीठावर माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज जाचक, आदी मान्यवरांसह कामगारवर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होता.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, साखर धंद्यात कामगार हा महत्त्वाचा असून, कामगारांत स्थैर्य येणे गरजेचे आहे. सध्या कारखान्यांचे खासगीकरण सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कामगारांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. राज्य शासनाने कामगारांचे प्रश्न सोडवले नाही तर ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल.
अध्यक्षीय भाषणात जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात साखर कामगारांची आव्हाने मोठी झाली आहेत. कामगारांबरोबरच शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. सध्या साखर कारखान्यात ४० टक्के कामगार कंत्राटी असल्यामुळे मूळ कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. कामगारांच्या हितासाठी संघटित झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी प्रास्ताविकात कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश्न मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली. कार्यक्रमाचे स्वागत सरचिटणीस रावसाहेब पाटील यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष रणनवरे यांनी मानले