थकीत ऊस बिलासाठी ‘प्रहार’चे आंदोलन

अहिल्यादेवीनगर : थकित ऊस बिलाच्या मागणसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात २७ मे रोजी ठिय्या व मुक्काम आंदोलन करण्यात आले. .
थकीत ऊस बिले पंधरवडा व्याजासह एकाच वेळेस शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली होती. तुम्ही परस्पर कारखानदारांची बैठक बोलावली. पण तक्रारदार म्हणून आम्हाला आणि काही प्रतिनिधी म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुनावणी दरम्यान का बोलावले नाही, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातील संचालक, उपसंचालक आणि साखर आयुक्त कारखानदारांना पाठीशी घालत आहेत. यांचे नियंत्रण साखर कारखान्यावर अजिबात राहिले नाही. शेतच कुंपण खात आहे, असा आरोप अभिजीत पोटे यांनी केला.
प्रादेशिक उपसंचालक (साखर) शुभांगी गोंड यांनी सर्व कारखान्यांच्या कार्यकारी संचालकाना लेखी आदेश दिले असून त्यात गळीत हंगाम २०२३-२४ हा संपलेला असून १५ मे २०२४ रोजीच्या एफआरपी पंधरवडा अहवालानुसार बऱ्याच कारखान्यांनी ऊस पुरवठादारांना संपूर्ण ऊस बिल अदा केलेले नाही.
ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार ऊस पुरवठादाराचा ऊस कारखान्यास प्राप्त झाल्याच्या १४ दिवसांपर्यंत ऊस पेमेंट करणे आवश्यक असताना आपण विलंबाचे व्याजसह ऊस बिल अदा न केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कार्यालयात २२ मे रोजी आढावा सभा घेण्यात आलेली होती. सदर सभेत आपले कारखान्याचे प्रतिनिधी यांनी थकीत ऊस पेमेंटबाबत लेखी दिले आहे. त्यानुसार थकित बिल अदा करावे, असे अावाहन करण्यात अाले.
थकीत ऊस बिल पेमेंट एकरक्कमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावे व ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील तरतूद ३ व ३ (अ) नुसार तत्काळ थकीत ऊस पेमेंट अदा करण्याची कार्यवाही करून तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा, याबाबत दिरंगाई झाल्यास साखर आयुक्तालयास पुढील योग्य कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशारा प्रादेशिक साखर सहसंचालक शुभांगी गोंड यांनी दिला.