साखर मूल्यांकन दर वाढवा : परिचारक दिल्लीत
सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. आमदार प्रशांत परिचारक यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटून एन.सी.डी. सी. कडील साखरेच्या मूल्यांकन दरामध्ये वाढ करणेबाबत पत्राद्वारे विनंती केली. त्याचबरोबर एन.सी.डी.सी. चे कार्यकारी संचालक बंसल यांना भेटून साखर मालतारण कर्जावरील मूल्यांकन दर वाढवणेबाबतही विनंती केली असून येणाऱ्या आठवड्यात याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे बंसल यांनी आश्वासन दिले.
राज्यातील साखर कारखाने एन.सी.डी. सी. कडून साखर मालतारण कर्ज उपलब्ध करून घेतात. त्यांना सध्या साखर मालतारण कर्जावरील उचलीचा प्रति क्विंटल दर रुपये ३ हजार १०० इतका असून त्यामधून पंधरा टक्के मार्जिन मनी रक्कम वजा जाता फक्त २ हजार ६३५ रुपये प्रति क्विंटल इतकीच रक्कम कारखान्यांना उपलब्ध होत आहे.
तथापि दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांकडून साखर मालतारण कर्जावरील उचलीचा दर प्रति क्विंटल ३ हजार ४०० ते ३ हजार ५०० रूपयापर्यंत आहे. तसेच साखरेचा बाजारभाव प्रति क्विंटल ३ हजार ५०० ते ३ हजार ७०० रूपयापर्यंत आहे.
त्यामुळे एन.सी. डी.सी कडून साखर मालतारण कर्जावरील मिळणारा उचलीचा दर कमी असल्यामुळे साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम व तोडणी वाहतूक खर्चासाठी रक्कम कमी उपलब्ध होत असलेचे माहिती परिचारक यांनी दिली. त्यास अनुसरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एन.सी.डी.सी.चे कार्यकारी संचालक बंसल यांना फोनवरून सूचना दिल्या असून प्रशांतराव परिचारक यांनीही एन.सी.डी.सी.चे कार्यकारी संचालक बंसल यांना भेटून साखरेचा मूल्यांकन दर वाढवणेकरिता विनंती व पाठपुरावा केला असून येणाऱ्या आठवड्यात याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे बंसल यांनी आश्वासन दिले.