छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक, गावडे उपाध्यक्ष

पुणे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे पृथ्वीराज जाचक यांची, तर उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील जय भवानी माता पॅनल सत्तेवर आले आणि बुधवारी छत्रपती कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक होऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्यात आले. नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कृषी पदवीधर आहेत.
प्रारंभी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाली. तेथे नावांवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची कारखान्यावर बैठक झाली. पृथ्वीराज जाचक यांचे नाव अध्यक्षपदासाठी सर्वानुमते बिनविरोध निवडण्यात आले. त्यानंतर उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये कैलास गावडे यांचे नाव संचालक शरद जामदार यांनी सुचवले. त्याला पृथ्वीराज घोलप यांनी अनुमोदन दिले आणि त्यांची ही निवड बिनविरोध झाली.
निवडणुकीची प्रक्रिया प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीमध्ये झाली.
निवडीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी सभासदांना अपेक्षित असाच कारभार करून दाखवू, अशी ग्वाही अध्यक्ष जाचक यांनी यावेळी दिली.