चांगल्या कारभारामुळे जनतेचा विश्वास : थोरात

संगमनेर : चांगल्या कारभारामुळे थोरात कारखान्यावर सभासद शेतकरी व तालुक्यातील जनतेचा मोठा विश्वास असल्याचे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत. गुंजाळवाडी येथील कृष्णा लॉन्स व समनापूर येथे झालेल्या कारखाना सभासद, शेतकरी व युवकांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाबासाहेब ओहोळ, लहानभाऊ गुंजाळ, आर.बी. राहणे, इंद्रजीत थोरात, बाळासाहेब ढोले, सिताराम राऊत, लक्ष्मणराव कुटे, संतोष हासे, नवनाथ आरगडे, संपतराव गोडगे, रामनाथ कुटे, योगेश भालेराव, लताताई गायकर, निर्मला गुंजाळ, अंकुश ताजणे, सरपंच नरेंद्र गुंजाळ, रामनाथ कुडे, भास्कर शर्माळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी थोरात म्हणाले की, राजकारण हे नेहमी समाजाच्या विकासासाठी करायचे असते. हे तत्व घेऊन आपण सर्वांना सोबत घेऊन सातत्याने काम केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याचा कारभार सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील समृद्धी, झालेली विकास कामे, निळवंडे धरण, कालव्यांची कामे यामागे सततचे कष्ट आहेत. चांगला कारभार व व्यवस्थापनामुळे सर्व शेतकरी सभासद व जनतेचा कारखान्यावर मोठा विश्वास आहे.
ऊस उत्पादन वाढीसाठी ‘एआय’चा वापर करावा लागणार
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मोठी चर्चा होती. मात्र तालुक्यातील जनतेच्या सभासदांचा शेतकरी विकास मंडळावर मोठा विश्वास होता. मोठ्या मताधिक्याने नक्कीच विजय होता. निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. आज कालव्यांमधून पाणी येते आहे यामध्ये कष्ट आहेत. सर्वांना सोबत घेऊन राजकारणाची पद्धत, सुसंस्कृत राजकारण ही आपली वेगळी परंपरा आहे. आपण कामात कुठेही कमी नाही. आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल हा सर्वांना अविश्वसनीय आहे. अनेक जण इच्छुक होते; परंतु अनेकांनी माघार घेतल्याने संचालक मंडळ बिनविरोध होते याचा आनंद आहे. मात्र, पुढील काळात एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी काम करावे लागणार आहे. यामध्ये एआयचा वापर करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.
थोरात यांच्या नेतृत्वावर जनतेचा कायम विश्वास : डॉ. तांबे
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर तालुक्यातील जनतेचा कायम विश्वास आहे. संगमनेरचा सहकार हा राज्यात प्रथम क्रमांकाचा आहे. सहकार हे राजकारणाचे ठिकाण नाही. सहकाराचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे. सध्या निवडणुकांमध्ये द्वेष भावना पसरवली जात आहे. चुकीच्या पद्धतीचा वापर केला जात आहे. यामुळे देशाचे भवितव्य अंधकारमय झाले असून कार्यकर्त्यांनी जनतेशी अधिक संपर्क वाढवावा, असे आवाहन डॉ. तांबे यांनी केले.