पुण्यात होणार केंद्रीय सहकार विभागाचे केंद्र

मोनिका खन्ना यांची घोषणा ; मल्टीस्टेट संस्थांच्या अडचणी सुटणार
कोल्हापूर : देशभरातील मल्टीस्टेट सहकारी संस्थांच्या वाढत्या तक्रारी आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन, केंद्रीय सहकार विभागाचे कामकाज आता लवकरच पुण्यातून सुरू होणार आहे. केंद्रीय सहकार सहनिबंधक मोनिका खन्ना यांनी कोल्हापूर येथे आयोजित कार्यशाळेत ही महत्त्वाची घोषणा केली. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि परिसरातील मल्टीस्टेट संस्थांवरील देखरेख अधिक प्रभावी होणार आहे.
फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी, पुणे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सांगता समारंभ व एकदिवसीय कार्यशाळेचे शुक्रवारी कोल्हापुरात आयोजन योजन करण्यात आले होते. फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम, बेळगाव जिल्हा उपनिबंधक रवींद्र पाटील, कर्नाटक स्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष डॉ. संजय होसमट, मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील, संस्थापक सल्लागार अॅड. एस. एस. गडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम म्हणाले, मल्टीस्टेट म्हणजे स्वायत्ता असे काहीसे समीकरण झाले असून, या संस्थांनी स्वतःहून काही बंधने पाळणे गरजेचे आहे. राज्याचे सहकार आयुक्त यांच्यानंतर मल्टीस्टेट संस्थांसाठी खाली काहीच यंत्रणा नसल्याने संस्थांवर नियंत्रणाच्या मर्यादा येतात. बेळगाव जिल्हा उपनिबंधक रवींद्र पाटील म्हणाले, राज्यांच्या सहकार कायद्यांची बंधने नकोत म्हणूनच मल्टीस्टेट संस्थांचा घाट घातला जात आहे. कर्नाटक स्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष डॉ. संजय होसमट म्हणाले, कर्नाटकात सहकार विभागाचे काम सर्वच क्षेत्रांत आहे. विशेष म्हणजे, सहकारी रुग्णालये उभी राहिल्याने सामान्य माणसाला आधार मिळत आहे.
सुरेश वाबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील, संस्थापक सल्लागार अॅड. एस. एस. गडगे आदी उपस्थित होते.





