उसाला जादा ५०० रुपये देण्याची शेकापची मागणी
कोल्हापूर : कारखानदारांना उसाच्या एफआरपीपेक्षा जादा ५०० रुपये देण्याचे निर्देश द्यावेत यासह आधारभूत किमतीने खरीप हंगामातील पिकांच्या खरेदीसाठी आठवडा बाजारात शासकीय केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली. याबाबत ‘शेकाप’तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये शेतमजुरांना दरमहा पाच हजार रुपयांची पेन्शन योजना लागू करावी, शेतीपंपासाठी सलग दहा दिवस विनाखंडित वीजपुरवठा करावा, शेतीपंपासाठी सरासरी बिलिंग पद्धत रद्द करावी, घनमापन पद्धतीने मीटर बसवून पाणीपट्टी वसुलीचे धोरण रद्द करावे, अनियमित पाऊस व अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची भरपाई द्यावी आदी मागण्यात करण्यात आल्या. माजी आमदार संपतराव पवार, शहर चिटणीस बाबूराव कदम, चंद्रकांत बागडी, वसंत कांबळे, लक्ष्मण नाईक, केरबा पाटील, बाबासाहेब देवकर, भारत पाटील आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.