श्री दत्त कारखान्याच्या अध्यक्षपदी रघुनाथ पाटील
कोल्हापूर : सहकारी साखर कारखानदारीत नेहमी अग्रेसर असलेल्या शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रघुनाथ देवगोंडा पाटील यांची, तर व्हाईस चेअरमनपदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांची एकमताने निवड झाली.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलने एकहाती सत्ता मिळवली. शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची विशेष सभा झाली. यावेळी दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी चेअरमनपदासाठी रघुनाथ पाटील यांचे नाव सुचवले. ज्येष्ठ संचालक अनिलकुमार यादव यांनी त्यास अनुमोदन दिले. चेअरमनपदासाठी रघुनाथ पाटील यांचाच एकमेव अर्ज आल्याने रघुनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
व्हाईस चेअरमनपदासाठी संचालक अरुणकुमार देसाई यांनी शरदचंद्र पाठक यांचे नाव सुचवले, तर ज्येष्ठ संचालक इंद्रजीत पाटील यांनी त्यांना अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदी पाठक यांची एकमताने निवड झाली. या निवडीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नूतन चेअरमन पाटील व व्हाईस चेअरमन पाठक यांचा सत्कार केला.
सभेस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे, ‘दत्त’चे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे यांच्यासह नूतन सर्व संचालक उपस्थित होते.