डॉ. राहुल कदम यांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर : साखर उद्योग क्षेत्र आणि सामाजिक कार्यात भरीव योगदान दिल्याबद्दल उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांना ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२४’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘डीएमईजेए’ अर्थात डिजिटल मीडिया एडिटर्स जर्नालिस्ट असो. च्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात.
डॉ. राहुल कदम यांच्या नेतृत्वाखाली उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने नेत्रदीपक प्रगती केली आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण कमी करणे, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन आदींसाठी कारखान्याला आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. ‘सीएसआर’च्या माध्यमातून साखर उद्योग क्षेत्रात सर्वाधिक ‘चॅरिटी वर्क’ करण्याचा मानही या साखर कारखान्याकडे जातो. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘डीएमईजेए’नेही त्यांना शानदार कार्यक्रमात महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित केले.
‘उदगिरी शुगर’ ला आणखी यशोशिखरावर नेण्यासाठी या पुरस्काराने मला निश्चित प्रेरणा मिळेल, असे उद्गार डॉ. राहुल कदम यांनी काढले.
‘डीएमईजेए’ ही डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असून, कोल्हापूर येथे प्रसिद्ध सिद्धगिरी म्युझियमच्या सभागृहात २८ आणि २९ जानेवारी रोजी संघटनेचे दुसरे वार्षिक अधिवेशन पार पडले.
अधिवेशनाचे उद्घाटन छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते, तर उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, ‘आयुष्यमान भारत’च्या मिशन महाराष्ट्रचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, संघटनेचे अध्यक्ष , ज्येष्ठ पत्रकार राजा माने आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. समारोप समारंभ महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरणाने आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या ‘प्रकट मुलाखती’ने झाला. अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली. ती खूप गाजत आहे.