केनरस : शुद्ध नैसर्गिक रस उत्पादनात महत्त्वपूर्ण संशोधन
सांगलीच्या तरुण इंजिनिअरची यशकथा/ Weekend Special
उसाचा साठवणूक योग्य रस निर्माण करण्याचे, म्हणजे शुगरकेन ज्यूस उत्पादनाचे अनेक प्रयोग झाले. मात्र त्यात भले भले संशोधक अपयशी ठरले. कारण ऊस रसाचे अल्पजीवीपण. उसापासून रस काढल्यानंतर तो त्वरित प्यावा लागतो, अन्यथा अवघ्या काही मिनिटांत तो खराब होतो. पिण्यायोग्य राहात नाही. मात्र सांगलीच्या तरुण इंजिनीअरने हे करून दाखवले आहे. साखर तंत्रज्ञ, इंजिनिअर राहुलसिंह पाटील हे या तरुणाचे नाव. ‘केनरस’ हा ब्रँड त्यांनी रसप्रेमींसाठी बाजारात आणला आहे.
सध्या उसाची साखर, इथेनॉल, बगॅस, सीबीजी, कोजनरेशन अशी उत्पादने आणि उपयोग आहेत. उसाचा सध्याच्या प्रचलित उत्पादनांमध्ये नव्या आरोग्यदायी उत्पादनाची भर श्री. पाटील यांच्या क्रांतिकारी संशोधनामुळे पडू शकते. मध्यंतरी कोविड काळात साखर कारखान्यांनी सॅनिटायझरचे ब्रँड उत्पादित केले. स्वत:चे रसाचे ब्रँडदेखील ते आता बाजारात आणू शकतील.
वाचा एका तरुणाच्या संशोधन प्रवासाची ही प्रेरणादायी कहाणी, त्यांच्याच शब्दांत…..
मी राहुलसिंह पाटील, केनरस या उसाच्या रसाच्या ब्रँडचा संस्थापक आहे. केनरस हा कमालीच्या स्वच्छ आणि निर्ज़ंतुक वातावरणात पाकिटबंद केलेला उसाचा नैसर्गिक रस आहे, जो नैसर्गिक तापमानात सहा महिने घरात ठेवता येतो आणि तुम्हाला हवं तेव्हा पिता येतो.
त्याची पिण्यायोग्य आयुमर्यादा (शेल्फ लाइफ) वाढवण्यासाठी मी माझे स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले आहे, त्यामुळे ते नैसर्गिकरीत्या सहा महिन्यांपर्यंत साठवले जाऊ शकते. इतर वेळी तुम्ही पाहता की उसाचा रस पंधरा-वीस मिनिटांमध्येच खराब होतो. तो पिण्यायोग्य राहत नाही. म्हणूनच तुम्हाला ग्रामीण वा शहरी भागात रसवंत्या दिसतात, ज्या तुमच्या गरजेप्रमाणे तेथेच उसापासून रस काढून येतात.
माझ्या केन-रसची कथा आरोग्याच्या काळजीतून आणि उत्सुकतेतून जन्मास आली. ती सुरू होते माझ्या कॉलेज जीवनापासून. मी महाराष्ट्रातील सांगलीचा.
मी शुगर टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकी पदवी संपादन केली आणि इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिपमध्ये एमबीए करण्यासाठी मी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (STBM) पुणे येथे दाखल झालो.
इंजिनिअरिंग पदवीपर्यंतचे शिक्षण सांगलीतच झाले. पुण्यात आल्यानंतर, घरापासून दूर राहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. हॉस्टेल लाइफमध्ये मला प्रकर्षाने जाणवले, की म्हणजे आरोग्यदायी ताजा फ्रुट ज्यूस, आणि उसाचा रस याला आपण पुण्यात आल्यापासून मुकलो आहोत. सांगलीमध्ये आपल्याला सर्वत्र ऊस मुबलक प्रमाणात आढळतो आणि रसवंतीगृहेदेखील. त्यामुळे तेथे कोणीही कधीही ऊस रसाचा आस्वाद घेऊ शकतो.
सध्याचे फ्रुट ज्यूस म्हणजे साखर अन् पाणी
मी आरोग्याबाबत खूप जागरूक आहे. म्हणजे ‘हेल्थ कॉन्शस’ म्हणा. त्यामुळे ज्यूस पिण्याकडे माझा अधिक कल. पुण्यात आल्यानंतर ताजे ज्यूस मिळणे अवघड झाल्याने, मी संत्रा, सफरचंद, पेरू इत्यादी फळांचे दुकानात उपलब्ध असलेले पॅक्ड किंवा डबाबंद केलेले ज्यूस प्यायला सुरुवात केली. एके दिवशी मी डब्यावर काय लिहिले आहे ते निरखून पाहिले. ते वाचून मला धक्काच बसला. मला असे आढळले की बाजारात मिळणारे तथाकथित आरोग्यदायी ज्यूस हे फक्त साखरेचे पाणी किंवा फळांचा लगदा असते. त्यात फळांचे प्रमाण फक्त २ ते १६ टक्के एवढेच. म्हणजे अत्यंत अल्प प्रमाण आणि बाकी सर्व फक्त साखर आणि पाणी.
मी खूप नाराज झालो. कारण लोक त्यांच्या आरोग्यासाठी इतर पेयांपेक्षा फळांचा रस निवडतात. पण बाजारात मिळणारे हे फ्रूट ज्यूस नसून, आहेत केवळ साखर आणि पाणी. म्हणून, मी ठरवले की आपण काही तरी केले पाहिजे.
शुगर टेक्नॉलॉजिस्ट असल्याने मला उसाचे खूप ज्ञान आहे आणि त्याचे आरोग्य फायदेही मला माहीत आहेत. मी पल्प किंवा कॉन्सेन्ट्रेट्स न वापरण्याचा निर्णय घेतला, त्याऐवजी मला उसाचा नैसर्गिक रस डबाबंद किंवा पाकिटबंद करून लोकांच्या सेवेत सादर करायचा होता, जेणेकरुन जे लोक विश्वासाने पितात, त्यांच्या आरोग्यास खऱ्या अर्थाने लाभकारी ठरेल.
मग मी उसाच्या रसाचे सध्याचे मार्केट आणि उपलब्धता याचा अभ्यास केला, असता असे दिसून आले की, सध्या उसाचा रस लहान आउटलेटवर (रसवंतीगृह) वितरीत केला जातो, ज्यामध्ये खालील तोटे आहेत:
१) उसाच्या रसाचे स्टॉल अजिबात स्वच्छ नाहीत. रस पिण्याचे ग्लास आणि इतर साधनांवर सर्वत्र माशा बसत असतात. ग्लास व्यवस्थित धुतले जात नाहीत.
२) उसाचा रस विकत घेण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जावे लागते, आणि तो दुकाने, सुपरमार्केट आणि हॉटेलमध्ये कुठेही उपलब्ध नाही.
3) उसाचा रस 15-20 मिनिटांत नैसर्गिकरित्या ऑक्सिडाइज होतो, ज्यामुळे तो घरी नेणे कठीण होते. किंवा तो पुनर्विक्रीसाठी साठवणे शक्य नाही.
या समस्या आणि बाजारातील तफावत दूर करण्यासाठी मला नवी कल्पना सुचली.
प्रयोगशाळा ते छोटा प्लँट
मी माझ्या शेवटच्या मुद्द्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, उसाचा रस १५-२० मिनिटांत ऑक्सिडाइज होतो, त्यामुळे त्याची साठवणूक क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक होते. जे माझ्यासमोरचे मोठे आव्हान होते.
मी त्यावर काम करायला सुरुवात केली. दीड वर्षाच्या संशोधनानंतर, मला हवे ते परिणाम मिळू लागले. मी उसाचा रस नैसर्गिकरीत्या पॅकमध्ये कॉन्सन्ट्रेट किंवा लगदा न ठेवता साठवू शकलो.
त्यानंतर सुरू झाला दुसरा टप्पा. प्रयोशाळेत मला मोठे यश मिळाले होते, मात्र ऊस रसाचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन करणे शक्य आहे का हे तपासून पाहणे आवश्यक होते. त्यासाठी मी एप्रिल 2018 मध्ये छोटा प्लांट उभारण्याचे ठरवले आणि या प्रक़ल्पाची उभारणी व्हायला वर्षभराचा वेळ लागला. 2019 च्या उन्हाळ्यात मी चाचणी घेतली, व्यावसायिक उत्पादनात मी यशस्वी झालो. त्यावेळी मिळालेला आनंद अवर्णनीय आहे. (अपूर्ण)
संपूर्ण माहितीसाठी ‘शुगरटुडे’चा जानेवारी २०२३ चा अंक जरूर वाचा
अधिक माहितीसाठी संपर्क ८९९९७७६७२१
Rahul Patil Contact – 7038000087