मागील हंगाम व यंदाच्या दुसऱ्या हप्त्याचे मिळून १५० रु द्या : राजू शेट्टी
पुणे : मागील हंगाम २०२२-२३ मधील गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसाचे शंभर व यंदाच्या दुसऱ्या हप्त्याचे पन्नास रुपये तातडीने देण्यास ऊस दर नियंत्रण समितीने त्वरित मान्यता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे.
साखर संकुल येथे ८ ऑगस्ट रोजी दुपारी साखर आयुक्तांची भेट घेऊन शेट्टी यांनी विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी स्वाभिमानीने मांडलेल्या विविध मुद्यांवर आणि ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक त्वरित घेण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले.
उसाच्या मागील हंगामातील रास्त आणि किफायतशीर किंमतीपेक्षा जादा पैसे देण्यासाठी राज्यातील सर्व कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करणे गरजेचे आहे. मे महिन्यातच स्वाभिमानीने याबाबत साखर आयुक्तांकडे केलेल्या मागणीनुसार साखर आयुक्तांनीही लेखी पत्राद्वारे सर्व कारखान्यांना कळविले आहे. साखर आयुक्तांनी गत हंगामातील कारखान्यांची अंतिम दरासाठीची व पुढील हंगामातील पहिल्या उचलीची बैठक तातडीने लावून हंगामाआधीच प्रश्न सोडविण्याची मागणीही शेट्टी यांनी केली.
शेतकर्यांच्या वतीने साखर कारखाने उसाची तोडणी आणि वाहतूक करतात. त्यांचा खर्च अंतरानुसार कपात करुन तो दर वाजवी ठेवण्यात यावा, अशीही महत्वपूर्ण मागणीही शेट्टी यांनी यावेळी चर्चेत केली. कारखाने तोडणी वाहतूक खर्चात इतरही खर्च लावतात आणि कार्यक्षेत्राबाहेरीलही ऊस आणून शेतकर्यांवर भुर्दंड टाकतात. तो येत्या हंगामापासून बंद झाला पाहिजे, अशीही मागणी साखर आयुक्तांकडे केली.