पवार कुटंबाच्या कारखान्यांकडून रोज दीड लाख टन गाळप : शेट्टी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

एफआरपी कायद्यात दुरुस्ती करताना शरद पवार गप्प होते…

कोल्हापूर : यंदा एकरकमी ‘एफआरपी’सह 3700 रुपये पहिली उचल द्यावी. साखर कारखानदारांकडे 20 दिवसांचा वेळ आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत विचारविनिमय करा आणि आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या; अन्यथा गाठ ‘स्वाभिमानी’शी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
तसेच, पवार कुटुंबांच्या मालकीचे अनेक साखर कारखाने आहेत, त्याद्वारे दररोज 1 लाख 50 हजार टन ऊस गाळप होते. एफआरपी कायद्यात दुरुस्ती होताना शेतकऱ्यांचे कथित नेते शरद पवार गप्प होते, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकर्‍यांचे पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही. जे स्वाभिमानीची चळवळ मोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशांना जयसिंगपूरच्या याच चौकात उघडे-नागडे केल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशारा स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 23 वी ऊस परिषद विक्रमसिंह क्रीडांगणावर शुक्रवारी झाली. यावेळी शेट्टी यांनी ऊस दराची मागणी केली. शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुती सरकार हे दोघेही चोर मावसभाऊ वाटून खाऊ अशी यांची भूमिका असल्याने यांनी चौपट मिळणारी भरपाई दुप्पट करून शेतकर्‍यांच्या अन्नात विष कालवले आहे. त्यामुळे हे सरकार या शेतकर्‍यांना टोलमध्ये भागीदारी देत नाही. त्यांनी मात्र फक्त यात पैसे मिळवायचे धोरण आखले आहे.

मी निवडणुकीत पराभूत झालो म्हणून खचणार नाही. जेवढे शेतकर्‍यांसाठी करता येईल, तेवढे मी करणार आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधींसह स्वातंत्र्य सैनिकांनी अहोरात्र लढून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यामुळे देशातील शेतकर्‍यांसाठी ही चळवळ थांबणार नाही. माझ्यावर खून, दरोडे यासारखे गुन्हे त्या त्या वेळच्या सरकारनी दाखल केले आहेत. यासह हजारो कार्यकर्त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळत आहे, असे शेट्टी म्हणाले.

मी 23 वी ऊस परिषद जाहीर केल्यानंतर मला पहिला शिव्या दिल्या आहेत. माझा पराभव झाला तेव्हा अनेकांनी मला हिणवले. मी लोकसभेत नसलेला तोटा म्हणजे शुगर कंट्रोल ऑर्डरमध्ये दुरुस्ती केल्याने गुर्‍हाळघरे व जागरी कारखाने बंद पडणार आहेत. शिवाय एफआरपी कायद्यात दुरुस्ती करताना शरद पवार यांनीही एक शब्द काढला नाही. पवार कुटुंबामध्ये दररोज 1 लाख 50 हजार टन गाळप करणारे कारखाने आहेत. सध्या अनेकजण जातीचे कार्ड घेऊन फिरत आहेत. पण माझ्या मते, लुटणारा आणि लुटारूंचा साथीदार या दोनच जाती आहेत. राज्यात चळवळ शिल्लक नाही. त्यामुळे आमची असलेली ही चळवळ मोडीत काढण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत, असा आरोपीही त्यांनी केला.
अध्यक्षस्थानी शिवाजीराव रोटे होते. स्वागत शैलेश आडके तर प्रास्ताविक पै. विठ्ठल मोरे यांनी केले. प्रथम दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली.

यावेळी स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक म्हणाले, गेल्या वर्षी आंदोलन केल्यामुळे दिवाळीला 100 रुपये आम्ही जमा करायला भाग पाडले आहे. जर पंढरपूर साखर कारखान्याला 3500 रुपये एकरकमी दर द्यायला येतो, मग कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना यापेक्षा जादा दर द्यायला येतो. जे म्हणत होते आम्हाला पैसे नको व स्वाभिमानीमुळे ऊस जायला उशिर झाला हे म्हणणारेच पैसे जमा झाल्यानंतर बँकेच्या पहिल्या रांगेत पैसे काढायला उभे होते. सध्या निवडणूक होत आहे. जे साखर कारखानदार 4 हजार रुपये दर जाहीर करतील, त्या कारखानदारांना आम्ही बिनविरोध निवडून द्यायला तयार आहे. आम्हाला राजकारण करायचे नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्वाभिमानीचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी जयसिंगपूर, शिरोळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता.

अनेकजण म्हणते होते, मी मशाल घेऊन लोकसभा निवडणूक लढवावी. त्यामुळे मशाल घेतली असती तर आता मी खासदार म्हणून भाषण केले असते; पण ऊस परिषद घेण्यासाठी मला 10 वेळा उद्धव ठाकरेंना फोन करावा लागला असता आणि काय बोलू हे विचारावे लागले असते. हेच स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी मी स्वबळावर निवडणूक लढवली. मला परिणामांची चिंता नाही, असे शेट्टी म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »