हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन ‘कर्मयोगी’चे तज्ज्ञ संचालक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

इंदापूर -येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी राजवर्धन हर्षवर्धन पाटील आणि सतीश उत्तमराव काळे यांची निवड करण्यात आली. माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दोघांना मंगळवारी नियुक्तीपत्र देण्यात आले.

इंदापूर तालुक्यातील युवा उदयमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले राजवर्धन पाटील हे उच्चशिक्षित असून ते शहाजीनगर येथील निरा भिमा कारखान्याचे संचालक, इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत.

तसेच जनतेमध्ये मिसळण्याचा स्वभाव व तालुक्यातील जनसंपर्कामुळे त्यांनी सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्थान निर्माण केले आहे. तसेच दुसरे तज्ञ संचालक सतीश काळे हे डिकसळ परिसरात गेली अनेक वर्षे राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात सक्रियरीत्या कार्यरत आहेत. या दोघांचे निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.


जाधव यांचा राजीनामा
यापूर्वी घडलेल्या एका नाट्यमय घडामोडीत, कारखान्याचे संचालक राहुल जाधव यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त करत संचालक पदाचा राजीनामा दिला.

एकीकडे गावोगावी पक्ष संघटना बळकटीकरण करू, असे जाहीर सभेत भाषणातून सांगायचे आणि दुसरीकडे पक्षातील माणसाकडून पक्षातीलच माणसाचे खच्चीकरण करायचं, अशी पाटील यांची दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप करून, त्यामुळे आणि बहुजनातील नेतृत्व निर्माण होण्यास अडथळा करण्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन मी संचालक पदाचा राजीनामा स्वतःहून देत आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.

जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल जाधव यांचे राहुल जाधव चिरंजीव आहेत. जाधव यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा सोमवारी (दि. १३) कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखाना कार्यालयात स्वतः हजर राहून जमा केला. दरम्यान, युवकांच्या ज्येष्ठांच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात लवकरच पुढील दिशा व पक्ष ठरवणार असल्याचेदेखील जाधव यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »