आज रामनवमी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, मार्च २६, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ५, शके १९४८
सूर्योदय : ०६:३८ सूर्यास्त : १८:५१
चंद्रोदय : १२:४२ चंद्रास्त : ०२:२५, मार्च २७
शक : १९४८
संवत्सर :पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : अष्टमी – ११:४८ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – १६:१९ पर्यंत
योग : शोभन – ००:३२, मार्च २७ पर्यंत
करण : बव – ११:४८ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २२:५५ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : १४:१६ ते १५:४८
गुलिक काल : ०९:४१ ते ११:१३
यमगण्ड : ०६:३८ ते ०८:०९
अभिजित मुहूर्त : १२:२० ते १३:०९
दुर्मुहूर्त : १०:४२ ते ११:३१
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२४
अमृत काल : ०६:५० ते ०८:२१
वर्ज्य : ०३:५१, मार्च २७ ते ०५:२४, मार्च २७

श्री राम चंद्र कृपालू भजमन हरण भाव भय दारुणम्।
नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्।।
कंदर्प अगणित अमित छवी नव नील नीरज सुन्दरम्।
पट्पीत मानहु तडित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम्।।
भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम्।
रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नन्दनम्।।
सिर मुकुट कुण्डल तिलक चारु उदारू अंग विभूषणं।
आजानु भुज शर चाप धर संग्राम जित खर-धूषणं।।
इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनम्।
मम ह्रदय कुंज निवास कुरु कामादी खल दल गंजनम्।।

हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांची जन्म तिथी. प्रभू श्रीराम हे वाल्मीकिंनी रचलेल्या ’रामायण’या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार आहेत.
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हटले जाते.

पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते..

आज रामनवमी आहे.

‘जय जय रघुवीर समर्थ’ समर्थ रामदासांच्या ह्या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला.

जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले. अंतःकरणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंतःकरणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले –

धिर्धरा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका ।
केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥

मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला.

शके १५७० मध्ये त्यांनी चाफळ येथे राममंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गांवी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण अकराशे मठ आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला.

१६०८ : आज श्री समर्थ रामदास जयंती आहे.( नारायण सूर्याजीपंत ठोसर ) चैत्र शु. ९, शके १५३० (२४ मार्च १६०८) निर्वाण : माघ कृ. ९, शके १६०३ (१३ जानेवारी १६८१).

दीप मेरे जल अकम्पित,
धुल अचंचल !
सिन्धु का उच्छ्वास घन है,
तड़ित् तम का विकल मन है,
भीति क्या नभ है व्यथा का
आँसुओं से सिक्त अंचल ! – महादेवी वर्मा

महादेवी वर्मा ह्या १९१९मधे अलाहाबादमधल्या क्रास्थवेट कॉलेजात प्रवेश घेऊन हुशार व मेधावी विद्यार्थिनीच्या रूपात पुढे जात जात त्या १९३२मधे अलाहाबाद विश्वविद्यालयातून संस्कृत विषयात एम.ए. झाल्या.

अत्यंत प्रतिभावान कवयित्री होत्या. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं असल्यामुळे त्यांना ‘आधुनिक मीरा’ पण म्हंटले जाते. कवी निराला ह्यांनी तर त्यांचा हिंदीच्या विशाल मंदिरातील सरस्वती असा उल्लेख केला आहे.

अलाहाबादच्या प्रयाग महिला विद्यापीठाच्या विकासकार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्या काळात हे काम म्हणजे महिला क्षेत्रात क्रांती घडविणारे पाऊल होते. ह्या विद्यापीठाच्या त्या प्रधानाचार्य व कुलगुरू पण होत्या। १९३२मध्ये त्यांनी चाँद नावाच्या एका महिलांच्या मासिकाच्या मुख्य संपादक झाल्या.
प्रतिभावान कवयित्री व गद्य लेखिका महादेवी वर्मा संगीतातपण निपुण होत्या. त्याचबरोबर कुशल चित्रकार व सृजनात्मक अनुवादक पण होत्या. त्यांना हिंदी साहित्यातील सगळ्याच मोठ्या पुरस्कारांनी गौरविले गेले होते.

भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५२ मधे उत्तर प्रदेश विधान परिषदेत त्यांना सदस्य बनविले. १९५६ मधे भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक सेवेसाठी त्यांना पद्मभूषण ही उपाधी दिली.. १९७९ मधे त्या साहित्य ॲकॅडमीच्या पहिल्या महिला सदस्य होत. भारत सरकार कडून १९८८ मधे त्यांना मरणोपरान्त पद्मविभूषण देऊन भूषविले.

१९६८ मधे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मृणाल सेन ह्यांनी त्यांच्या स्मरणार्थ ‘वह चीनी भाई’ वर ‘नील आकाशेर नीचे’ नामक एक बंगाली चित्रपटाची निर्मिती केली. १६ सप्टेंबर १९९१ ला भारत सरकारने महादेवी वर्मांच्या सन्मानार्थ जयशंकर प्रसादांसमवेत २ रुपयांचे एक पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. त्यांच्या अतीत के चलचित्र या पुस्तकाचा मराठी अनुवाद’ ’बिंदा, सांबिया आणि… ’या नावाने प्रकाशित झाला आहे.

त्या भारतामधील ५० यशस्वी महिलांमधील एक होत.
‘यामा’ नामक काव्य संकलनासाठी त्यांना भारत सरकार चा सर्वोच्च सन्मान ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देण्यात आला.

१९०७: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)

पद्मभूषण पुरस्कार सन्मानित चित्रकार कटिंगेरी कृष्णा हेब्बार ( के. के. हेब्बर ) – हेब्बर अकरा वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. हेब्बर वयाच्या पंधराव्या वर्षी ज्या शाळेत शिकत होते, त्याच शाळेत नोकरीला लागले. शाळेत शाकुंतल हे काव्य चित्रांच्या साहाय्याने शिकवताना, शाळा-तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्याने त्यांची काही चित्रे पाहिली व त्यांना कलाशिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले.

एकविसाव्या वर्षी त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. नंतर म्हैसूरच्या चामराजेंद्र टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला; पण तेथे त्यांचे मन न रमल्यामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडले व पुढील कलाशिक्षणासाठी ते मुंबईला गेले (१९३३) आणि दंडवतीमठ यांच्या नूतन कला मंदिरामध्ये त्यांचे कलाशिक्षण सुरू झाले. पुढे त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी. डी. आर्ट ही पदविका घेतली (१९३८). दंडवतीमठ व जे. जे.मधील ब्रिटिश कलासंचालक जेरार्ड यांना ते गुरुस्थानी मानत. तत्पूर्वी आईच्या आग्रहाखातर त्यांचा विवाह झाला (१९३५). १९३९–४६ या काळात हेब्बरांनी जे. जे. स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून काम केले. त्या काळात त्यांची चित्रनिर्मितीही चालू होती.

१९४९ मध्ये ते यूरोप दौऱ्यावर गेले. १९४९-५० या दरम्यान पॅरिसमधील ‘अकादमी ज्यूलियन’मध्ये त्यांनी सहा महिन्यांचे चित्रकलेचे शिक्षण घेतले, तसेच दृक्प्रत्ययवादाचे चित्रणतंत्र त्यांनी आत्मसात केले. त्यानंतर ‘एकोल एस्टीन’ या कलाशाळेत मुद्राचित्रतंत्राचा (प्रिंट मेकिंग) विशेष अभ्यास केला. भारतात परतल्यावर हेब्बर यांनी जवळजवळ पाऊण वर्ष महाबळेश्वर येथे वास्तव्य केले. महाबळेश्वर येथील मुक्काम त्यांना स्वत:चा शोध घ्यायला उपकारक ठरला. कलानिर्मितीच्या पूर्वसंकेतांपासून स्वातंत्र्य घेतल्याने आविष्काराच्या नानाविध दिशा त्यांना गवसू लागल्या. निसर्गातील घटकांचा, रंगरेषा-रचनांचा त्यांनी नव्याने शोध घेतला. महाबळेश्वर ही त्यांची जणू प्रयोगशाळाच ठरली.

जे. जे.मध्ये शिकताना व शिकवत असतानाही हेब्बर यांच्यावर आधुनिक पाश्चात्त्य चित्रकला व भारतीय पारंपरिक कलाशैली या दोहोंचाही प्रभाव होता. या दोन्ही कलाप्रवाहांनी त्यांना आकर्षित केले होते. ब्रिटिश चित्रकार जेरार्ड हे त्या काळात जे. जे. चे कलासंचालक होते. पाश्चात्त्य कलाजगतातील आधुनिक कलाचळवळींचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. दृक्प्रत्ययवादी शैलीत ते चित्रे काढायचे. कलानिर्मितीत व्यक्तिनिष्ठ आविष्कारास ते महत्त्व देत. हेब्बरांच्या एकूण निर्मितीवर याचा परिणाम झाला.

रॉयल अकादमीच्या पठडीबद्ध शैलीचे अनुकरण न करता स्वत:चे काहीतरी स्वतंत्र सर्जनशील वैशिष्ट्य निर्माण करावे व कलेतील भारतीयत्व जपावे, अशी जाणीव याचकाळात त्यांना झाली. याच कालखंडात आनंद कुमारस्वामी यांच्या प्रिन्सिपल्स् ऑफ इंडियन आर्ट या ग्रंथानेही ते प्रभावित झाले. यातूनच जैन चित्रशैली, मोगल लघुचित्रशैली, अजंठा भित्तिचित्रे इ. भारतीय चित्रशैलींचा त्यांनी सखोल अभ्यास केला. भारतीय चित्रशैलीतील सपाट रंगलेपन व रेखांकन यांनी ते प्रभावित झाले.

भारतीय चित्रशैलीचा पूर्णत: प्रभाव असलेले कॅटल मार्ट (गुरांचा बाजार, चिकणरंग, १९४२) हे त्यांच्या कला-कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळातील चित्र महत्त्वाचे ठरते. तसेच १९४१ मधील सुवर्णपदकविजेते चित्र कार्ले गुंफा हे पूर्णत: ‘अकादेमिक’ ( काहीसे दृक्प्रत्ययवादी शैलीत) पद्धतीने तैलरंगात रंगविलेले दिसते.

हेब्बर यांची एकंदर चित्रसंपदा पाहताना त्यांना वेळोवेळी भावलेल्या विषयांनुसार त्यांच्या आविष्कारांच्या तऱ्हा व शैली बदलत गेलेल्या दिसतात. सामाजिक व सांस्कृतिक सभोवतालाला त्यांनी नेहमीच आपल्या चित्रांतून प्रतिसाद दिला. जीवनातील आनंददायक क्षण, भारतीय सण-उत्सव, धार्मिक विधी, लोकसंस्कृती तसेच ग्रामीण जनजीवनातील विषय यांबरोबरच बांगला देशाचे युद्ध, भोपाळ वायु-दुर्घटना इत्यादी प्रासंगिक घटना हे ही त्यांचे चित्रविषय झाले. त्यांच्या काही चित्रांमधून प्रतीकात्मकता दिसते.

१९७०–७२ नंतरच्या काळातील त्यांच्या चित्रांतील अभि-व्यक्तीकरिता त्यांनी अमूर्त शैलीचा आधार घेतलेला दिसतो. वैज्ञानिक शोधांच्या कुतूहलातून आलेली, विशेषत: अवकाश-संशोधनविषयक चित्रे अमूर्तरूपी वाटतात. तसेच ‘एनर्जी’ या विषयांतर्गत पंचमहाभूते या मालिकेतील पाच तत्त्वांचा आविष्कार प्रतीकात्मक पातळीवर करणाऱ्या पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या विषयांवरील चित्रांतून अमूर्तता आणि आध्यात्मिकता याचा एक संयोग साधलेला दिसतो.

हेब्बर यांना अनेक पारितोषिके व मानसन्मान लाभले : कलकत्ता अकादमी ऑफ फाइन आर्ट या संस्थेचे सुवर्णपदक (१९४१), बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक (१९४७), सलग तीन वर्षे राष्ट्रीय पुरस्कार (१९५६–५८), म्हैसूर विद्यापीठाची मानद डी. लिट्. पदवी (१९७६), भारत सरकारचे प्रतिष्ठित पद्मश्री (१९६१) व पद्मभूषण हे पुरस्कार (१९८९), तसेच सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार (१९८३) व महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०). दिल्ली येथील ललित कला अकादमीचे (१९८०–८४) ते अध्यक्ष होते.
स्वातंत्र्योत्तर काळातील चित्रकारांत अस्सल भारतीय आशयाची चित्रनिर्मिती करणारे कलावंत म्हणून हेब्बर अग्रस्थानी आहेत. त्यांच्या कन्या रेखा राव यासुद्धा एक समकालीन चित्रकर्त्री म्हणून प्रसिद्ध आहेत.

१९९६: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित चित्रकार कटिंगेरी कृष्णा हेब्बार ( के. के. हेब्बर )यांचे निधन. (जन्म : १५ जून, १९११)

  • घटना :
    १५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.
    १९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
    १९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
    १९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिली महिला कैदी दाखल झाली.
    १९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
    १९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
    १९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.

• मृत्यू :

• १९९७: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर, १९१०)
• १९९९: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर, १९४२)
• २००३: गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या.
• २००८: दलित साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन. (जन्म: १७ जुलै , १९३०)
• २०१२: प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचे निधन. (जन्म: १० मे, १९३७ )

  • जन्म :

१९०९: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर, २०००)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »