‘रामेश्वर’चे १८ संचालक बिनविरोध

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जालना : भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी केवळ २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत विरोधकांनी उमेदवारी अर्जच दाखल केले नाहीत. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गटाच्या १८ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ऊस उत्पादक गट व राखीव मतदारसंघातील २१ जागांसाठी २३ जणांचे अर्ज आले. यात केवळ टेंभुर्णी ऊस उत्पादक गटातील ३ जागेसाठी ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुक बिनविरोध होऊ शकली नाही. या निवडणुकीत आमदार संतोष दानवेसह १८ उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे.

यावेळच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काही जुन्या संचालकांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. २१ पैकी १८ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कारखान्यावर रावसाहेब दानवे, आमदार दानवे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.

राजूर गटात गणेश फुके, विजय वराडे, कमलाकर साबळे यांची तर भोकरदन गटातून दादाराव राऊत, प्रकाश गिरणारे, मधुकर तांबडे यांची बिनविरोध निवड झाली.
पिपळगाव रेणुकाई गटातून भगवान सोनुने, पंडित नरवडे, अशोक लोखंडे, जाफराबाद गटातून सुरेश परिहार, आत्माराम चव्हाण, महादू दुनगहू, टेंभुर्णी गटातून जगन बनकर, माधवराव गायकवाड, कौतिकराव वरगणे, जगन वरगणे, श्रीराम गाडेकर, तर

सहकारी संस्था मतदारसंघातून आमदार संतोष दानवे, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून रामराव हिरेकर, महिला मतदारसंघातून शोभा मतकर, तान्हाबाई भागीले, इतर मागासवर्गीय मतदार संघातून विलासराव आडगावकर, विमुक्त जाती-जमाती मागास प्रवर्गातून सुरेश दिवटे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »