‘श्री रामेश्वर’च्या चेअरमनपदी परिहार, तर व्हाईस चेअरमनपदी तांबडे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जालना : भोकरदन तालुक्यातील श्री रामेश्वर सहकारी कारखान्याच्या चेअरमनपदी विजयसिंह परिहार आणि व्हाईस चेअरमनपदी मधुकर तांबडे यांची बिनविरोध निवड झाली.

श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सन २०२३ ते २०२८ साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी २१ अर्ज प्राप्त झाल्यामुळे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती. चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा २६ ऑक्टोबर रोजी बोलविण्यात आली होती.

चेअरमन पदासाठी परिहार व व्हाईस चेअरमन पदासाठी तांबडे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांची निवड जाहीर केली.

कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी कारखान्याच्या उभारणी काळापासून ते आजपर्यंत जो विश्वास दाखविला त्याला आजपर्यंत तडा जाऊ दिला नाही व यापुढेही जाऊ देणार नाही अशी ग्वाही परिहार व तांबडे यांनी निवडीनंतर दिली. यावेळी संचालक मंडळ सर्वश्री गणेश बापू फुके, दादाराव महाराज राऊत, कमलाकर पा. साबळे, प्रस्ताव गिरणारे, आबाराव गायकवाड, संजय लोखंडे, प्रभाकरराव सोनूने, सुखदेवराव गाडेकर, गोविंदराव पंडीत, मोतीराम नरवडे, इ. उपस्थित होते..

श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पॅनल बिनविरोध निवडून आणून श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर परत एकदा वर्चस्व सिध्द केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »