समाजसेवा परंपरेचे पाईक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

उद्योजक रतन टाटा यांच्या जन्मदिनानिमित्त

प्रा. नंदकुमार काकिर्डे

Nandkumar Kakirde

जगभरातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण उत्पादन करण्यामध्ये टाटा समूह अग्रगण्य आहे. त्याचबरोबर समाजसेवेची मोठी परंपरा या उद्योगाला लाभलेली आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्यापासून सुरू झालेल्या समाजसेवेच्या परंपरेची धुरा वाहणारा गेल्या पन्नास वर्षातील पाईक म्हणून रतन टाटा यांचे नाव आदराने घेतले जाते.

भारतातील सर्वात प्रतिष्ठित टाटा कुटुंबातील नवल टाटा यांचे पुत्र रतन टाटा. 28 डिसेंबर 1937 मध्ये मुंबईत त्यांचा जन्म झाला. प्रारंभीचे शिक्षण मुंबईत आणि आर्किटेक्चर व स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधील तसेच प्रगत व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षण अमेरिकेतील विद्यापीठात झाले. काही काळ आयबीएम कंपनीत नोकरी केल्यानंतर डिसेंबर 1962 मध्ये रतन टाटा यांचा टाटा समूहात प्रवेश झाला. प्रारंभीच्या सात-आठ वर्षांमध्ये त्यांनी विविध कंपन्यांमध्ये अनुभव घेतला.यामध्ये जमशेदपूर येथील टाटा स्टील मध्ये कोळसा उचलण्यापासून भट्टीत काम करण्यापर्यंत त्यांनी सर्व प्रकारचे काम केले. त्यानंतर 1971 मध्ये टाटा समूहातील आर्थिक संकटात असलेल्या नेल्को या कंपनीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर 1977 मध्ये समूहातील एम्प्रेस मिल ची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. अपयशाची चव लाभलेल्या रतन टाटा यांच्याकडे 1991 मध्ये टाटा समूहाचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यानंतर त्यांनी टाटा समूहाचे आधुनिकीकरण व जागतिक पातळीवर विस्तार केला. टाटा समूहातील टाटा मोटर्स या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जगातील सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो बाजारात सादर करून यशस्वी केली. तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) ही अग्रगण्य कंपनी निर्माण केली. रतन टाटा यांनी जग्वार लॅन्ड रोव्हर, कोरस स्टील व टेटली टी यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या ताब्यात घेऊन जागतिक पातळीवर टाटा समूहाची पताका फडकवली.

टाटा समूहाच्या संस्थापकांनी विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी विविध ट्रस्ट स्थापन केले होते. आजोबांपासून सुरू झालेले समाजसेवेचे हे व्रत रतन टाटा यांच्या काळात जास्त अधोरेखित झाले. उद्योग क्षेत्रातील यशाबरोबरच रतन टाटा यांचे खरे योगदान समाजसेवा व परोपकार या क्षेत्रात वाखाण्याजोगे आहे. त्यांनी सातत्याने समाजसेवेला उद्योग क्षेत्रातील यशा इतकेच महत्त्व दिलेले होते. टाटा समूहाचा नफा केवळ उद्योग, व्यापारात न वापरता तो समाज सेवेसाठी वापरण्याची खंबीर भूमिका त्यांनी सातत्याने घेतली. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रतन टाटा यांनी आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास व स्वच्छतेच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यातील रतन टाटा यांचे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या विविधा ग्रामीण भागांमध्ये त्यांनी आरोग्य व शिक्षणासाठी मोठे प्रकल्प उभे करून यशस्वी करून दाखवले.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी टाटा ट्रस्ट ने अनेक योजना आखल्या. मुंबईमध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा त्यात गौरवाने उल्लेख करावा लागेल. टाटा कुटुंबीयांनी 1941 मध्ये या रुग्णालयाची उभारणी केली होती. तेथे कॅन्सर या दुर्धर रोगावरील संशोधन आणि जवळजवळ मोफत उपचार दिले जातात. रतन टाटा यांनी या रुग्णालयामध्ये लक्ष घालून तेथे अद्ययावत सुविधा निर्माण केल्या व वैद्यकीय सेवांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. याशिवाय बालकांचे कुपोषण,शुद्ध पाणी व मातृ आरोग्य यासारख्या विषयावरही त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले. 2011 मध्ये त्यांनी कलकत्ता येथे टाटा मेडिकल सेंटरची उभारणी केली. या केंद्रातूनही कॅन्सर रुग्णांना अत्यंत अल्प दरामध्ये उपचार केले जातात.

देशामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसारासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक प्रकल्प हाती घेतले व त्याचबरोबर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यासारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेमध्ये टाटा समूहाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. रतन टाटा यांनी या संस्थांच्या विकासामध्ये मोठा सहभाग घेतला होता.

शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान व गणितासारख्या विषयांमध्ये चांगली रुची निर्माण व्हावी म्हणून पुण्यात उभारण्यात आलेल्या भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेला मोठे आर्थिक पाठबळ खुद्द रतन टाटा यांनी दिले होते. पंतप्रधानांचे माजी विज्ञान सल्लागार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि. ग. भिडे यांनी मुक्तांगण विज्ञानशोधिकेची कल्पना मांडली होती. डॉ. भिडे यांचे या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन शिवाजीनगर परिसरात उभारण्यात आलेल्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेला पहिली पाच वर्षे काही कोटी रुपयांचे भरघोस आर्थिक सहाय्य स्वतः रतन टाटा यांनी जमशेदजी ट्रस्टच्या माध्यमातून दिलेले होते. त्यावेळची एक नमूद करण्यासारखी आठवण म्हणजे पुण्यासारख्या शहरात विज्ञान प्रसारासाठी वाहिलेल्या या अभिनव प्रयोगाचे त्यांना कौतुक होते. मात्र त्याचा प्रसार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर केला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर टाटा समूहाने दिलेले आर्थिक सहाय्य हे पहिल्या पाच वर्षासाठीच असेल व त्यानंतर मुक्तांगण संस्थेने आर्थिक पायावर स्वयंपूर्ण उभे राहिले पाहिजे यासाठी त्यांनी विशेष आग्रह धरलेला होता. त्या दृष्टिकोनातून त्यांचे या विज्ञान शोधिके वर विशेष लक्ष होते.

शिक्षण क्षेत्रासाठी 2008 मध्ये त्यांनी टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट स्थापन केला होता. त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मोठ्या प्रमाणावर दिली. त्याचप्रमाणे नाविन्यतेचा शोध घेण्यासाठी टाटा कॉर्नेल इन्स्टिट्यूट तर तंत्रज्ञान व डिझाईन यासाठी टाटा सेंटरची स्थापना केली. रतन टाटा यांनी ज्या हार्वर्ड बिजनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले तेथे 2011 मध्ये 50 मिलियन डॉलरची देणगी देऊन अत्याधुनिक स्वरूपाचा टाटा हॉल उभारलेला होता. या वैशिष्ट्यपूर्ण सभागृहात अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 2015 मध्ये त्यांनी कॉर्नेल येथे टाटा इनोव्हेशन सेंटर उभारले. नवीन उद्योजकांचे संगोपन करण्यासाठी या केंद्राचा वापर केला जातो.

ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्ये विविध भागातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी पाणी व्यवस्थापन व शेतीतील सुधारणा करण्यासाठी टाटा ट्रस्ट सातत्याने काम करत होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध विकास प्रकल्प सुरू केले व त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले गेले. ग्रामीण विकासामध्येच स्वच्छ भारत अभियानाला रतन टाटा यांनी मोठा पाठिंबा दिलेला होता. ग्रामीण भागात शौचालयांची निर्मिती, स्वच्छतेबाबत सर्व पातळ्यांवर प्रशिक्षण व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विविध प्रकल्प सुरू करण्यामध्ये त्यांचे योगदान होते. त्यामुळेच ग्रामीण भागातील आरोग्य व जीवनमानात मोठी सुधारणा झाल्याचे श्रेय रतन टाटा यांना निश्चित द्यावे लागते. टाटा डिजिटल इंडिया या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांचे उत्पन्न उत्पादकता वाढावी म्हणून स्वतंत्र आखणी केली. टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट ची स्थापना त्यांनी 2005 मध्ये करून जेथे प्रकल्प आहेत त्या परिसरातील जनतेचे आरोग्य शिक्षण व अन्य विकासाची कामे सातत्याने आली. त्याचप्रमाणे ग्रामीण विकासासाठी त्यांनी टाटा वॉटर मिशन हाती घेतलेले होते. त्याचे काम आजही शेकडो गावांमध्ये अत्यंत कार्यक्षमपणे सुरू आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी खूप मोलाचे योगदान दिलेले आहे. यामध्ये सौर ऊर्जा पवन ऊर्जा व कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प यांची उभारणी स्वतः लक्ष घालून त्यांनी अनेक ठिकाणी केलेली आहे. देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करण्यासाठी तसेच हवामान बदलाच्या क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन उपक्रमाचा प्रारंभ त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला आहे.

देशावर आलेल्या विविध संकटाच्या प्रसंगी रतन टाटा यांनी केलेली भरीव मदत ही खऱ्या अर्थाने विशेष लक्षणीय बाब होती. 2004 मध्ये देशात आलेली सुनामी किंवा 2019 मध्ये आलेली कोविड ची महामारी या दोन्ही संकटांमध्ये रतन टाटा यांनी स्वतः लक्ष घालून मोठे अर्थसहाय्य केले होते. त्यांनी कोविडच्या काळात पंधराशे कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करून त्यातून विविध रुग्णालयांसाठी उपकरणे, व्हेंटिलेटर व गरजूंच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबवले गेले होते.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलेला होता. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विज्ञान संशोधन, औषध निर्माण व तंत्रज्ञानातील नवप्रकल्पांना त्यांनी प्रोत्साहन दिले होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च( टीआयएफआर) या संस्थेच्या माध्यमातून विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधनाचे काम हाती घेण्यात आले व त्याला सातत्याने रतन टाटा यांचा भरघोस पाठिंबा लाभलेला आहे.

महिलांच्या सक्षमीकरणांमध्ये रतन टाटा यांचा मोलाचा वाटा आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या यामध्ये महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी देणे,त्यांना शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था करणे आणि त्याचबरोबर आरोग्य सुविधा पुरवणे अशा पद्धतीची यंत्रणा त्यांनी निर्माण केलेली होती.

टाटा एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिक्षण व संशोधन करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले होते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधी प्राप्त झाली. रतन टाटा यांनी सामाजिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम सुरू केले. नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी रतन टाटा यांनी अनेक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेली होती व त्याद्वारे करून उद्योजकांच्या कल्पकतेला त्यांनी चांगली संधी दिली.

रतन टाटा यांची समाजसेवा ही केवळ आर्थिक किंवा औद्योगिक योजना पुरती मर्यादित नाही तर मानवी जीवनाच्या बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये ती विस्तारलेली आहे.
त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले योगदान इतके मोठे आहे ही आजच्या तरुण पिढीला अशा प्रकारचे काम पुढे नेण्याची नक्की प्रेरणा मिळेल.

*(लेखक अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून बँक संचालक आहेत)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »