उंदरांनी फस्त केला ४ कोटींचा ऊस

कानपूर : यावर्षी कानपूरमधील घाटमपूर या ऊस उत्पादक क्षेत्रात उसाचे उत्पादन सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच कारखान्यांसाठी शेतात ऊस शिल्लक राहिला नाही. कारण, शेतात मोठ्या संख्येने झालेला उंदरांचा सुळसुळाट. प्रशासनाच्या अंदाजानुसार उंदरांनी तब्बल ४ कोटींहून अधिक किमतीचा ऊस फस्त केला. नंतर उरलीसुरली कसर पावसाने भरून काढली, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला.
घाटमपूर तहसील परिसर ऊस उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र घाटमपूर येथील साखर कारखाना बंद पडल्याने, ऊस क्षेत्र कमी होत गेले. सध्या, शेतकरी सुमारे ४५० हेक्टर जमिनीवरच ऊस लागवड करत आहेत.
साधारणपणे एका हेक्टरमध्ये शंभर टनावर ऊसाचे उत्पादन होते. घाटमपूर परिसरात शेतकरी एका हेक्टर शेतात ७५० क्विंटल ऊस लावतात. गेल्या वर्षी, उसाच्या पिकाला पहिल्यांदाच पावसाचा फटका बसला, त्यामुळे ऊस उंच आणि जाड झाला नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऊस तयार झाला तेव्हा शेतात उंदीर मोठ्या संख्येने दिसू लागले. जेव्हा शेतकऱ्यांना उंदरांचा धोका समजला, तोपर्यंत उंदरांनी सुमारे २५ ते ३० टक्के ऊस चावून उद्ध्वस्त केला होता.
उंदीर मारण्याचे विष काम करत नव्हते
ऊसाचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात उंदीर मारण्याचे विषही टाकले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण उंदीर एका शेतातून दुसऱ्या शेतात जात राहिले. उंदरांनी चावल्यामुळे शेतात अनेक ठिकाणी उसाची झाडे पडली. पिके वाचवण्यासाठी शेतांनाही पाणी दिले जात होते. शेतातील पाणी सुकल्यावर उंदीर पुन्हा उसात शिरले.
४१० रुपये प्रति क्विंटल
उसाचा सरकारी भाव ३७० रुपये प्रति क्विंटल आहे. तर, या भागात गूळ बनवणारे कारखाने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ४१० रुपये रोख देत होते. हा हिशेब गृहित धरता उंदीर आणि कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान सुमारे ४ कोटी रुपयांचे आहे.
घाटमपूरचे वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक अखिलेश बहादूर पाल म्हणाले की, यावर्षी उसाच्या शेतात मोठ्या संख्येने उंदीर घुसले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उंदरांपूर्वी कमी पावसामुळे उसाच्या वाढीवरही परिणाम झाला होता.