‘रावळगाव’ यंदा विक्रमी गाळप करणार : बबनराव गायकवाड
नाशिक : स्पायका ग्रीन एनर्जी अँड ॲग्रो प्रा. लि. रावळगाव साखर कारखान्याने (ता. मालेगाव) येत्या गळीत हंगामात विक्रमी ऊस गाळपाचे नियोजन केले असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी सांगितले. कारखान्याचे बॉयलर प्रदीपन सुशील गुरगुळे आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्ञानेश्वरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष गायकवाड बोलत होते.
यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ऊसतोड कामगार व वाहतूकदार यांचे करारनामे देखील पूर्ण झाले आहेत. कारखान्याने मागील गळीत हंगामात उसाला उच्चांकी २ हजार ८०० रुपये दर दिला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे अध्यक्ष गायकवाड म्हणाले.
तसेच ऊसतोड वाहतूकदारांना नवीन ३४ टक्के वाढीसह बिले दिल्यामुळे तेदेखील आनंदी आहेत. आगामी हंगाम संपूर्ण क्षमतेने पूर्ण केला जाईल, असे उद्गारही गायकवाड यांनी काढले.
स्पायका ग्रीन एनर्जी अँड ॲग्रो प्रा. लि. रावळगाव कारखान्याचा हा दुसरा गळीत हंगाम आहे. हंगाम यशस्वीतेसाठी अधिकारी, कामगार प्रयत्नशील आहेत. ऊस नोंदीनुसार ऊसतोडीचे गटाप्रमाणे नियोजन केले आहे. आगामी हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही श्री. गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
पहिल्या हंगामात शेतकरी, ऊसतोड कामगार, मुकादम, कामगार आदी घटकांना कारखान्याने वेळेवर पैसे अदा केले. आगामी हंगामात सर्व घटकांच्या सहकार्याने विक्रमी ऊस गाळप केला जाईल, कारखाना सुरू झाल्याने गाव व परिसरातील शेकडो नागरिकांना रोजगार मिळाला आहे, असे गायकवाड यांनी नमूद केले. रावळगाव हा भारतातील खासगी क्षेत्रातील पहिला साखर कारखाना आहे. मध्यंतरी अडचणीमुळे कारखाना बंद पडला. आता आम्ही त्याच्या माध्यमातून या भागात पुन्हा आर्थिक क्रांती गतिमान करून, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष नानासाहेब आंबेकर, सचिव शिवाजी कामठे, संचालक अरुण गुरगुळे, भरतराव टिळेकर, रवींद्र चरवड, आदित्य कचरे, साहेबराव भामरे, गुलाबराव देवरे, प्रदिप सुर्यवंशी, परेश साखरे, भिवराज सोनवणे, बी आर नेरकर, मनोज चव्हाण, करण भाटे, सुरेश बाविस्कर, उन्मय चव्हाण आदिंसह ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोड मुकादम, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालक कुंदन चव्हाण यांनी प्रस्तावना केली. संचालक विकास म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक बी. एन. पवार यांनी आभार मानले.