एकसष्ठी निमित्त विशेष लेख…

माझे परमस्नेही श्री. रविकांत पाटील यांची सन २०२५ मध्ये वयाची एकसष्ठी सुरू आहे. त्यानिमित्त त्यांच्या साखर उद्योगातील योगदानाबद्दल लेख लिहिण्याच्या विचाराने मूळ धरले व तशा प्रकारचे विचार सुरू झाले. त्यादृष्टीने मला त्यांचे विषयी असलेल्या माहिती व्यतिरिक्त माहिती जमा करण्याचे काम मी सुरू केले. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले.
त्यावेळी माझ्या लक्षात आले की, रविकांत पाटील ही काही सामान्य व्यक्ती नव्हे. त्यामुळे त्यांच्याविषयी लिहिताना मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली. तसं पाहिलं तर त्यांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी आहे. त्यांचे योगदान हे साखर उद्योग, शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र या क्षेत्रांमध्ये रुजलेलं आहे, बहरलेलं आहे.
रविकांत पाटील यांनी बारावीनंतर कृषी क्षेत्रात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून ते कृषी पदवीधर झाले. त्यावेळी बँकांमध्ये, राज्य शासनामध्ये कृषी पदवीधरांना खूप चांगल्या नोकरी च्या संधी उपलब्ध होत्या, तरी देखील त्यांनी साखर कारखान्यात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना त्यांच्या वाड-वडिलांपासून ऊस व साखर कारखाने यांचा जवळून परिचय होता.
नेहमीप्रमाणे अगदी पहिल्या पदापासून म्हणजे *ॲग्री ओव्हरसीयर* या पदापासून त्यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात जवळच्या म्हणजे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोलापूर येथून केली. त्यांनी त्यानंतर शेती खात्यात जी दोन कौशल्य आवश्यक असतात ती म्हणजे ऊस पुरवठा आणि ऊस विकास या दोन्ही विभागात अधिकारी म्हणून काम केले. या दोन्ही विभागात अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला त्यामुळे दुष्काळामध्ये ऊसाची उपलब्धता कमी असताना बाहेरून ऊस मिळवणे व अतिरिक्त ऊस उपलब्ध असताना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊसाची विल्हेवाट वेळेवर लावणे ही दोन्ही आव्हाने त्यांनी सहज पेलली. हे करत असताना त्यांनी कारखाना व शेतकरी यांचे कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली.
ऊस तोडणीसाठी लागणाऱ्या मजुरांशी व ऊस वाहतूकदारांशी श्री. पाटील यांचे अत्यंत सलोख्याचे व विश्वासाचे नाते आहे. ज्या कारखान्यात ते असतील त्या कारखान्याला ऊस तोड मजूर कमी पडणारच नाहीत, हे समीकरण तयार झाले. त्यामुळे त्यांना मुख्य शेती अधिकारी म्हणून बोलावणे येऊ लागले. त्यांचे नाव महाराष्ट्रात एक आदर्श शेती अधिकारी म्हणून घेतले जाऊ लागले.
स्वामी समर्थ कारखान्यातही चमक
आता आपण आपल्या शेती खाते चांगले चालवण्याच्या या कौशल्याचा उपयोग इतर कारखान्यांनाही व्हावा, या उदात्त हेतूने सिद्धेश्वर कारखान्याच्या व्यवस्थापनास विनंती करून त्यांच्या संमतीने कारखाना सोडण्याचा निर्णय घेतला. सोलापूर जिल्ह्यातच स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड या कारखान्यात मुख्य शेती अधिकारी म्हणून हजर झाले. अपेक्षेप्रमाणे येथेही त्यांनी त्यांच्या कौशल्याची चमक दाखवली.
कारखाना चांगला चालू लागला; व्यवस्थापनाच्या कौतुकास ते पात्र झाले. सुदैवाने तेथे असतानाच कारखान्यात कार्यकारी संचालकाची जागा रिक्त झाली. व्यवस्थापनासमोर पाटील या सक्षम व्यक्तीचे नाव पुढे आले. त्यांच्याकडे त्वरित प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून पदभार सोपवण्यात आला. त्यावेळी तर पाटील यांची पूर्ण कसोटी लागली. तीव्र दुष्काळ पडला कारखाना चालवायला पाणी नसल्यामुळे कारखाना बंद ठेवण्याची वेळ आली होती, पण पाटील यांनी टँकरने पाणी आणून कारखाना चालवला व शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप केला.
स्वामी समर्थ कारखाना एव्हाना सुस्थितीत आला होता. त्यांचे तिथले काम संपले होते. लोकमंगल सारखा नामांकित ग्रुप त्यांची वाट पाहत होता. जवळच्या मित्रवर्यांनी त्यांना लोकमंगल अॅग्रो ग्रुप जॉईन करण्याचा सल्ला दिला. येथे त्यांना “जनरल मॅनेजरची” जबाबदारी देण्यात आली. या ग्रुपमध्ये बरेच उद्योग चालवले जात होते, उदा. साखर कारखाने, डिस्टिलरीज, मसाले उत्पादन, इत्यादी. या ठिकाणी देखील त्यांनी ऊसाची व तोडणी मजुरांची कमतरता असताना कारखाना चांगला चालविण्याचे आव्हान स्वीकारले व हा कारखाना यशस्वीपणे चालवून दाखविला.

चार कारखान्यांचे कार्यकारी संचालक
तेथे काम करीत असताना त्यांनी व्यवस्थापनाचा विश्वास संपादन केला. परिणामी त्यांना काम करताना आपोआपच स्वातंत्र्य मिळत गेलं. दरम्यानच्या काळात २०१५ साली त्यांची कार्यकारी संचालकांच्या पॅनलमध्ये निवड झाली. त्यानंतर त्यांनी व्ही. पी. शुगर, तडवळ या कारखान्यात “प्रेसिडेंट” म्हणून रूजू झाले. या ठिकाणी देखील त्यांनी आमूलाग्र बदल करून कारखाना यशस्वीपणे चालवला.
दरम्यानच्या काळात त्यांची कीर्ती महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे कर्नाटकातील नामांकित निराणी ग्रुपपर्यंत पसरली. त्यांना बोलावून घेण्यात आले व कार्यकारी संचालक म्हणून चार कारखाने चालविण्याची जबाबदारी देण्यात आली. यावरून आपल्या लक्षात येईल की, पाटील साहेबांची साखर कारखाने यशस्वीपणे चालविण्याची क्षमता जबरदस्त आहे.
निराणी ग्रुपमध्ये गेल्यावर बंद पडलेले कारखानेकमीत कमी दिवसात चालू करणे, ऊस गाळप क्षमता वाढविणे, उपपदार्थ निर्मिती प्लॅन्ट्स उभारणे ही कामगिरी करून दाखविली. श्री. पाटील हे बहुभाषिक असल्याने त्यांना कन्नड भाषा बोलता येत असल्याचा फायदा तेथील व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांच्याशी संवाद साधण्यासाठी झाला. लोकमंगल व निराणी ग्रुपमध्ये त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्याचे कारण म्हणजे त्यांची संस्थेवर असणारी निष्ठा आणि प्रत्येक व्यवहारात दाखवलेला प्रामाणिकपणा, त्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर असणारा आत्मविश्वास.
साखर उद्योगात जे नामांकित कार्यकारी संचालक आहेत त्यामध्ये श्री. पाटील यांचा समावेश होतो. त्यांच्याशी सहज गप्पा मारताना त्यांची आकलन शक्ती आणि एखाद्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन तिचे समूळ उच्चाटन करणे या गुणांची प्रचिती येते. पाटील साहेब म्हणजे एक प्रेरणा स्रोत. जिथे जातील तेथे ते उत्साहाचे वातावरण निर्माण करतात. अनुभवाच्या जोरावर व निष्ठेने कष्ट करण्याच्या स्वभावामुळे पाटील यांनी साखर उद्योगात मानाचे व आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, त्यांच्यासारखा मित्र मला लाभला. आमची वैचारिक पातळी जुळत असल्याने आमची साखर उद्योगातील स्थिती, परिस्थिती व समस्या यांवर नेहमीच चर्चा होते. विचारांची देवाण घेवाण होते. त्याचा उपयोग मला माझ्या कामकाजात होतो. त्यांच्या गुण वैशिष्ट्यांमुळे सर्व स्तरांत त्यांनी मोठा मित्र परिवार जोडलेला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हीच त्यांची संपत्ती आहे.
पाटील यांचा थेट संबंध परमेश्वराशी येतो. कारण त्यांच्या वडिलांचे नाव परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वराने त्यांना घडवताना कुठलीही कसर ठेवलेली दिसत नाही. परमेश्वराने श्री. पाटील यांच्या रूपाने साखर उद्योगाला एक प्रकारे देणगीच दिलेली आहे. अशा या कर्तृत्ववान मित्राला त्यांच्या एकसष्टी निमित्त माझ्याकडून व माझ्या कुटुंबियांकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या प्रगतीचा आलेख वर्षानुवर्षे असाच उंचावत जावो हीच सदिच्छा.
(सविस्तर लेख वाचण्यासाठी शुगरटुडेचा दिवाळी अंक जरूर घ्या. त्यासाठी ८९९९७७६७२१ वर व्हॉट्
सअप संदेश पाठवा किंवा sugartodayinfo@gmail.com वर इमेल पाठवा)
(लेखक श्री. डी. एम. रासकर हे श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मोबा. 9923002930)





