श्री विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई बेकायदा : लवाद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर केलेली जप्तीची कारवाई कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे द्यावा, असा आदेश पुण्याच्या कर्ज वसुली लवादाने गुरुवारी दिला.

abhijit patil, shri viththal sugar

राज्य बँकेने चारशे कोटी रुपयांच्या थकबाकीचे कारण देऊन कारखान्याची तीन गोदामे सील केली. त्यामध्ये सुमारे १४ हजार क्विंटल साखर अडकून पडली होती.

या कारवाईच्या विरोधात कारखान्याने कर्ज वसुली लवादाकडे धाव घेऊन अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली. त्यावर शिखर बँकेने हा अर्ज फेटाळण्याची मागणी केली. कारखान्याकडे मोठी थकबाकी असून, ती परत करण्याचे निर्देश कारखान्याला द्यावेत, अशी मागणी बँकेने केली.

लवादाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. वास्तविक, हा वाद न्यायप्रविष्ट असून, कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार नाही, असे बँकेच्या वकिलांनी मागील तारखेला सांगितले होते. तरीही बँकेने कारखान्याचे साखर साठविलेले तीन गोदामे सील केली. ही कृती अयोग्य आणि लहरीपणाची आहे, असे नमूद करून गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश दिले.

न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला असून, सीलबंद गोदामे खुली झाल्याने शेतकऱ्यांना पैसे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार शिखर बँकेनेही सहकार्य केले आहे, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे चेअरमन पाटील यांनी व्यक्त केली.

माढ्यात विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार पक्ष) धैर्यशील मोहिते पाटील यांना उतरवले आहे. मोहिते पाटील यांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला होता.
दरम्यान, शिखर बँकेने चारशे कोटी रुपयांच्या थकबाकीचे कारण देऊन अभिजित पाटील यांच्या कारखान्याची तीन गोदामे सील केली. त्यामध्ये सुमारे १४ हजार क्विंटल साखर अडकून पडली होती. या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लगेचच माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याप्रकरणी टीका करताना म्हटल आहे, की अभिजित पाटील यांना जनतेचा पाठिंबा असून, त्यांच्या मनात आमच्याबद्दल आस्था आहे. ती लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी त्यांना अडचणीत आणले. त्यांच्या कारखान्यातील दहा लाख टन साखर जप्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे, कामगारांचे वेतन अडकून बसले. शेवटी पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला. त्याबाबत मी त्यांना दोष देत नाही. परंतु, राज्यकर्ते कोणत्या टोकाला जातात, याचे हा कारखाना उत्तम उदाहरण आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »