सत्ताधाऱ्यांचा गैरव्यवहाराच्या फाईल्स माझ्याकडे; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
पुणे : सत्ताधारी नेत्यांच्या गैरव्यवहारांच्या अनेक फाइल्स माझ्याकडे आल्या आहेत, त्यात भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरणे आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी रविवारी केला.
आमदार पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीने दोन दिवसांपूर्वी जप्ती आणली आहे, या कारवाईनंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांत माझ्याकडे काही फाइल्स आल्या आहेत. सध्याच्या सरकारमधील गैरव्यवहारांबाबत तपास यंत्रणेतील अधिकाऱ्याने तयार केलेल्या त्या फाइल्स असाव्यात असे वाटते, असे ते पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.
त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील काही नेते आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या गटातील काही नेत्यांच्या गैरव्यवहारांची प्रकरणे असल्याचे दिसूून येत आहे, असा गंभीर आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आता ही प्रकरणे कधी बाहेर आणायची याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे..
माझ्याकडे आलेल्या फाइल्समध्ये काही गंभीर प्रकरणे असल्याचे दिसून येत आहे. मोठे गैरव्यवहार झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या फाइल्सची विधी तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. स्वच्छता, रुग्णवाहिका, साखर कारखाने या संदर्भातील प्रकरणे त्यात आहेत. तपास यंत्रणांंना ही प्रकरणे बाहेर यावीत असे वाटत असावे म्हणून या फाइल्स माझ्याकडे आल्या असाव्यात, अस रोहित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांच्यावर टीका करत रोहित पवार म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत आपल्या नेत्यांना तिकीट मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीला जावे लागत आहे. यापूर्वी शरद पवार हे निर्णय घेत होते. मात्र, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थक नेत्यांना पुरेशी तिकिटे मिळणार नाहीत. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांची परिस्थिती आणखी वाईट होणार आहे. अशी टीका देखील रोहित पवार यांनी केली आहे.